ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, दि. १० जून : ‘विकसित भारत संकल्प संमेलन’ व ‘आमदार विशेष जनसंपर्क अभियान’ अंतर्गत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी गोकुळनगर परिसरात विविध सामाजिक, पर्यावरणीय व जनसंपर्क उपक्रम राबवत नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्यात समाजातील विविध घटकांच्या समस्या जाणून घेत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
अभियानादरम्यान डॉ. नरोटे यांनी गोकुळनगर येथील शीख समाज मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील पटवा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी शीख समाजाच्या विविध समस्या, स्थानिक अडीअडचणी तसेच सामाजिक विकासाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यानंतर ज्येष्ठ नागरिक श्री. पुंडलिक संगिडवार यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. ज्येष्ठांचे अनुभव आणि आशीर्वाद हेच लोकसेवेची प्रेरणा असल्याची भावना डॉ. नरोटे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, भाजपा कार्यकर्ते श्री. रमणा बोंकुलवार यांना कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. उपचारासंदर्भातील माहिती घेऊन आवश्यक ते प्रशासकीय व वैद्यकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा कुटुंबाचा घटक असल्याचे सांगत संपूर्ण संघटना बोंकुलवार कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा विश्वास त्यांनी दिला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोकुळनगर पाण्याच्या टाकीजवळ आयोजित वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होत डॉ. नरोटे यांनी वृक्षारोपण केले. पर्यावरण संवर्धनासाठी केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संगोपन करून ती जगवण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या सर्व कार्यक्रमांना भाजपा शहराध्यक्ष तथा बांधकाम सभापती श्री. अनिल कुनघाडकर, नगरपरिषद उपाध्यक्ष श्री. निखिल चरडे, नगरसेविका सौ. साक्षी बोलूवार, भारती खोब्रागडे, घनश्याम वाढई, भाजयुमो शहराध्यक्ष श्री. साई सिलामवर, बूथ प्रमुख श्री. सागर सोनटक्के, नारायणजी भोयर , दोमाजी कुंभारे, श्री. संगिडवार, श्री. दिलीप पटवा, श्री. आकाश बोलूवार, श्री. आशिष सातपुते, श्री. तेजस लाकडे, श्री. पिंटू पुरावार, श्री. चेतन बोलूवार, श्री. यश कोंडावर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विकास, पर्यावरण आणि सामाजिक संवेदनशीलतेचा संगम
गोकुळनगरातील या दौऱ्यात जनसंपर्क, समाजातील विविध घटकांशी संवाद, ज्येष्ठांचा सन्मान, आजारी कार्यकर्त्याला दिलासा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश अशा विविध उपक्रमांमधून आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सामाजिक बांधिलकी व लोकाभिमुख कार्यपद्धतीचे दर्शन घडविले.











