धावती बस पेटल्याने उडाली खळबळ

380

गडचिरोली, ता. १ :

राज्य परिवहन महामंडळाच्या समस्या वाढतच असून गडचिरोली आगाराच्या एका बसगाडीने १ मार्च सकाळी मुलचेरा-घोट मार्गावर अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली होती. बसच्या चालक व वाहकाने प्रसंगावधान राखत जंगलातच बस थांबवून प्रवाशांना तत्काळ खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास मुलचेऱ्याहून गडचिरोलीला जाण्यासाठी निघालेल्या बसने( एमएच- ०७ सी-९३१६) घोट मार्गावर जंगल परिसरात अचानक पेट घेतला. ही बाब चालक व वाहकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांना तत्काळ खाली उतरण्यास सांगितले. त्यामुळे प्रवासी सुखरूप आहेत. बसच्या समोरील भागाला आग लागली होती. यावेळी बसमध्ये ७-१० प्रवासी असल्याचे कळते. बसमधील बॅटरीमुळे ही आग लागल्याचे आगार व्यवस्थापकांनी माध्यमांना सांगितले. अवेळी धावणाऱ्या भंगार बसेसमुळे जिल्ह्यातील नागरिकांचे प्रचंड हाल होत असताना आता जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ येत असल्याने या समस्यांकडे लक्ष देऊन सर्व समस्यांचे निवारण करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी आगारातील भंगार बसेसमुळे अनेकदा समस्या येत असतात. कित्येकदा प्रवासी ओरडतात. पण लक्ष देण्यात येत नाही. छप्पर उडालेल्या अवस्थेत धावणारी बस असो की पावसात छत्री घेऊन बसलेला चालक, अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. एकदा तर बसचे ‘वायपर’ खराब झाल्याने चालकाने चक्क हाताचा वापर करून बस चालविल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर सार्वत्रिक झाली होती. विधिमंडळातही यावर चर्चा झाली. मात्र, त्यानंतरही कोणतीच दखल घेण्यात आली नाही.