लैंगिक अत्याचार प्रकरणी सीईओंची जारावंडीला धाव

350

गडचिरोली, ता. १३ : एटापल्ली तालुक्यातील एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली हाेती. या घटनेच्या निषेधार्थ जारावंडीसह परीसरातील गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. जारावंडीकरांनी जनआक्रोश मोर्चा काढत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी जारावंडीला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला.

एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी संतोष नागोबा कोंडेकर (५२), रा. भेंडाळा ता. चामोर्शी याने ५ वर्षांच्या मुलीला प्राथमिक आरोग्य पथकाच्या शासकीय निवासस्थानी नेऊन लैंगिक अत्याचार केले होते. संतोष कोंडेकर हा प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई आहे. अत्याचार करताना एका मुलाने पाहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे मुलीला उपचार मिळाले नसल्याने तिला थेटट गडचिरोलीला आणावे लागले. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य केंद्राला टाळे ठोकले होते. ही माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली. परंतु येथील संतप्त नागरिकांनी रात्रभर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना त्याच आरोग्य केंद्रात डांबून ठेवल्याची माहिती कळताच मंगळवार (ता. १२) सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख् यकार्यकारी अधिकारी आयुषी सिंग तसेच उप मुख्यकार्यकारी अधिकार व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जारावंडीला भेट दिली. संतप्त नागरिकांना समजावत येत्या पाच दिवसांत सर्व समस्यांचे निराकरण करणार अशी ग्वाही देत टाळे ठोकलेल्या आरोग्य केंद्राला सुरू करण्यात आले. दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग म्हणाल्या.