ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. ८ : सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून आणि लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या सहकार्याने नागपूर येथे दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेले ‘गोल्फ फॉर ऑल’ प्रशिक्षण शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले.
“GAGAN” (Golf at Grassroots Across the Nation) या राष्ट्रीय संकल्पनेतून प्रेरित असलेल्या या उपक्रमाचा उद्देश गोल्फ हा खेळ सर्वांसाठी खुला करणे हा आहे. दिल्लीतील यशस्वी टप्प्यानंतर २७ ते २९ एप्रिलदरम्यान हा उपक्रम नागपुरात आयोजित करण्यात आला.
या शिबिरात वयोगट १० ते ३३ वर्षे दरम्यानचे एकूण २८ दिव्यांग सहभागी सहभागी झाले होते. यामध्ये दृष्टीदोष, श्रवणदोष, ऑटिझम, बौद्धिक अडचणी तसेच हालचालींमध्ये अडथळे असलेल्या दिव्यांगांचा समावेश होता. प्रत्येक सहभागीला एक “बडी” देण्यात आला होता. विशेष म्हणजे भारतीय वायुदलातील अधिकारी व विंग कमांडर यांनीही या उपक्रमात सहभाग घेत मार्गदर्शन केले.
तीन दिवस चाललेल्या या शिबिरात सहभागीांना गोल्फच्या मूलभूत तंत्रांची, विशेषतः चिपिंग आणि पुटिंगची माहिती देण्यात आली. सहभागी आणि त्यांच्या बडींमध्ये हळूहळू आत्मीय संवाद निर्माण झाला आणि हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित न राहता समावेशकतेचा सुंदर अनुभव ठरला.
नागपूरमधील तब्बल ४८ अंश सेल्सिअस उष्णतेनंतरही सहभागींचा उत्साह कायम राहिला. अंतिम दिवशी पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. प्रत्येक सहभागीला पदक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
माजी राष्ट्रीय गोल्फ प्रशिक्षक जसजित सिंग आणि दिव्यांग अध्ययन विषयातील पीएचडी डॉ. अर्चना सिंग यांच्या नेतृत्वाखाली “गोल्फ फॉर ऑल फाउंडेशन” कार्यरत आहे. गोल्फ हा खेळ सर्व सामाजिक-आर्थिक स्तरांपर्यंत पोहोचवणे, दिव्यांग व सामान्य व्यक्तींमध्ये समावेशकता वाढवणे आणि सहभागींच्या कौशल्यविकासाला प्रोत्साहन देणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
या उपक्रमाबाबत बोलताना लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनचे संचालक राजेश गुप्ता म्हणाले, “या शिबिरात आम्ही अशा दोन जगांना एकत्र येताना पाहिले, जी सहसा वेगळी ठेवली जातात. गोल्फ आणि दिव्यांगता यांकडे समाज वेगळ्या नजरेने पाहतो. मात्र या तीन दिवसांत त्या सर्व सीमा नाहीशा झाल्या. सर्वजण समान पातळीवर उभे होते. ‘गोल्फ फॉर ऑल’ हा केवळ खेळ शिकवण्याचा उपक्रम नसून अनेक वर्षांपासून बंद असलेली दारे उघडण्याचा प्रयत्न आहे.”
नागपूरमधील हा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असला तरी समावेशकतेचा हा प्रवास पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.










