गडचिरोली पोलीस दलाच्या स्किलिंग इन्स्टिट्यूटतर्फे १८० प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

44

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. ५ : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत चार चाकी वाहन चालक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला.

गडचिरोली पोलीस दलाच्या ‘दादालोरा खिडकी’ माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानाच्या सहकार्याने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्किलिंग इन्स्टिट्यूट, पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली व कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

दि. ३१/०३/२०२६ ते ०४/०५/२०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये गडचिरोली, जिमलगट्टा, एटापल्ली, भामरागड, हेडरी, सिरोंचा आदी उपविभागांतील एकूण १८० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. यामध्ये ५० पुरुष व १३० महिला प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता.

प्रशिक्षणादरम्यान सर्व प्रशिक्षणार्थ्यांना चार चाकी वाहन चालविण्याचे कौशल्य दिले असून त्यांना लर्निंग परवाना देण्यात आला आहे. तसेच लवकरच कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

स्किलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण १,६१० युवक-युवतींना चार चाकी वाहन चालक प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना कायमस्वरूपी परवानेही मिळवून देण्यात आले आहेत, ही विशेष बाब आहे.

दि. ०४/०५/२०२६ रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे पार पडलेल्या या निरोप समारंभात पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधत मोठी स्वप्ने बाळगण्याचे, आत्मनिर्भर होण्याचे आणि उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., जिल्हा कौशल्य सहाय्यक आयुक्त श्री. योगेंद्र शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.