ग्लोबल गडचिरोली न्यूज
आलापल्ली/नागेपल्ली, दि. ८ जून : सोशल मीडियावरील मैत्रीतून झालेल्या एका तरुणाच्या हत्येप्रकरणी आता नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही प्रसारमाध्यमांनी या घटनेला ‘समलैंगिक विवाहाचा नकार’ असे स्वरूप देत वृत्तांकन केले होते. मात्र, मृतकाच्या कुटुंबीयांनी हा दावा ठामपणे फेटाळून लावत ही हत्या आर्थिक ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीतून झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
नागेपल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत मृतकाचा भाऊ सारोज निषाद, मोठे भाऊ पवन बाथो आणि चुलत भाऊ ब्रजकुमार निषाद यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.
मुलीच्या नावाने बनावट अकाऊंट, लाखो रुपयांची उकळपट्टी
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने बनावट खाते तयार केले होते. तसेच मुलीच्या आवाजात संवाद साधून मृतकाशी मैत्री वाढवली. या मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपीने मृतकाला भावनिक जाळ्यात ओढले आणि त्याच्याकडून वारंवार लाखो रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फोन ब्लॉक केल्याने आरोपी थेट आलापल्लीत
सततच्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून मृतकाने आरोपीचे फोन क्रमांक ब्लॉक केले. त्यानंतर आरोपीने मृतकाच्या कुटुंबीयांशी व मित्रांशी संपर्क साधून दबाव टाकण्यास सुरुवात केली. मृतकाचा शोध घेत तो थेट आलापल्ली-नागेपल्ली परिसरात दाखल झाल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.
समजोत्याचे नाटक आणि दुसऱ्याच दिवशी हत्या
घटनेच्या आदल्या दिवशी मृतक व आरोपी यांची भेट झाली होती. यावेळी मृतकाने आरोपीला ब्लॅकमेलिंग थांबविण्याची ताकीद दिली होती. त्यावर आरोपीने माफी मागितल्याचे सांगितले जाते. मात्र, दुसऱ्याच दिवशी आरोपीने गोड बोलून मृतकाला आपल्या वाहनात बसवले आणि जंगल परिसरात नेऊन चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
चॅटिंग आणि बँक व्यवहारांचे पुरावे सादर
हे प्रकरण कोणत्याही प्रकारच्या समलैंगिक संबंधांशी संबंधित नसून आर्थिक फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगचे असल्याचा दावा करत कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत मोबाईल चॅटिंग, बँक ट्रान्झॅक्शन आयडी आणि इतर तांत्रिक पुरावे माध्यमांसमोर सादर केले.
‘सनसनाटी’ वृत्तांकनामुळे कुटुंबीय संतप्त
कोणतीही सखोल चौकशी न करता काही माध्यमांनी या घटनेला चुकीचे वळण दिल्याने आधीच दुःखात असलेल्या कुटुंबाच्या भावना दुखावल्या गेल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली. प्रसिद्धी मिळविण्याच्या घाईत काही माध्यमांनी सत्य परिस्थितीचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्याचे कष्ट घेतले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
चौकशी व कठोर शिक्षेची मागणीसखोल
हे प्रकरण वरकरणी दिसते त्यापेक्षा अधिक गंभीर असल्याचा दावा करत या संपूर्ण ब्लॅकमेलिंग रॅकेटची पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करावी, तसेच दोषी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी मृतकाच्या कुटुंबीयांनी केली आहे.











