ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, दि. ८ जून : चपराळा येथील श्री हनुमान मंदिर प्रशांत धाम ट्रस्टने अलीकडे उपस्थित केलेल्या विविध आरोप व आक्षेपांना श्री संत मुलीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर देवस्थान, हरनघाट (पारडी) संचालन समितीने सोमवारी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले. शासकीय विश्रामगृह, इंदिरा गांधी चौक येथे आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष संत मुलीधर महाराज विठ्ठलवार गुज्जनवार यांनी आरोपांमागील वस्तुस्थिती मांडत अनेक मुद्द्यांवर सविस्तर खुलासा केला.
संत मुलीधर महाराज यांनी सांगितले की, कार्तिक स्वामी महाराज यांच्या नावाचा अथवा छायाचित्राचा वापर करून प्रसिद्धी मिळविणे किंवा देणग्या गोळा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काही व्यक्तींकडून हेतुपुरस्सर भक्तांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. पावती पुस्तकांवर कार्तिक स्वामी महाराजांचे छायाचित्र छापल्याचा दावा करणाऱ्यांनी त्यासंबंधीचे ठोस पुरावे सार्वजनिक करावेत, असे खुले आव्हान त्यांनी दिले.
गुरू-शिष्य परंपरेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, हिंदू धर्मसंस्कृतीत प्रत्येक व्यक्तीला आपल्या श्रद्धेनुसार गुरू मानण्याचा अधिकार आहे. कार्तिक स्वामी महाराज यांना आपण गुरूस्थानी मानत असल्याने त्यात कोणतेही गैर नसून या नात्यावर आक्षेप घेणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हरनघाट ते चपराळा पालखी परंपरेबाबतही समितीने आपली भूमिका मांडली. कार्तिक स्वामी महाराजांच्या निधनानंतर हजारो भक्तांच्या स्वयंप्रेरणेने ही परंपरा सुरू झाली असून पालखीतून जमा होणाऱ्या देणग्या व धान्य नियमितपणे संबंधित ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात येत असल्याचा दावा समितीने केला. यासंदर्भातील सर्व आर्थिक नोंदी व हिशोब उपलब्ध असून त्याची पडताळणी करता येऊ शकते, त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप निराधार असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
अलीकडे चर्चेत आलेल्या विभूती प्रकरणाचा कार्तिक स्वामी महाराजांशी कोणताही संबंध नसल्याचेही समितीने स्पष्ट केले. चुकीची व अपूर्ण माहिती प्रसारित झाल्यामुळे भक्तांमध्ये गैरसमज निर्माण झाले असून काही माध्यमांनी वस्तुस्थितीची शहानिशा न करता बातम्या प्रसिद्ध केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
पत्रकार परिषदेत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चपराळा ट्रस्टचे सर्व आरोप बिनबुडाचे, तथ्यहीन व दिशाभूल करणारे असल्याचा दावा केला. तसेच या संदर्भातील सविस्तर खुलाशाच्या प्रती धर्मादाय आयुक्त कार्यालय, गडचिरोली तसेच सावली आणि आष्टी येथील पोलीस निरीक्षकांना पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष लच्छय्या मलय्या गद्देवार, सचिव सुभाष आडकुजी नागुलवार, सहसचिव अनिल मंसाराम कांमडी, कोषाध्यक्ष मुकेश मनोहर गुरनुले तसेच सदस्य नरेंद्र डोप्पाजी जक्कुलवार, भालचंद्र केवलराम राखडे, प्रकाश मारोती पाल, अतुल शामराव भिरकुरवार, सुनिल तुकारामजी बोमनवार आणि हरिदास देवाजी आभारे उपस्थित होते.











