माओवाद्यांनी ,पोलीस खबऱ्या ,असल्याचं संशयावरून केली एका इसमाची हत्या.

120

गडचिरोली,ता. २९ :

लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरू असताना माओवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले असून पोलिसांचा खबऱ्या असल्याचे सांगत एका आदिवासी इसमाची निर्घृण हत्या केली. ही घटना २९ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. अशोक तलांडे (रा. दामरंचा, ता. अहेरी) असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावरील ताडगाववरून जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतरावर अशोक तलाडे यांचा मृतदेह आढळून आला आहे. विशेष म्हणजे मृतदेहाजवळ काही पत्रके आढळून आली आहेत. त्यात अशोक हा पोलिसांचा खबऱ्याचा असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. अशोक तलांडेला अनेकदा सुधारण्याची संधी दिली होती. त्याच्या घरच्यांना आणि नातेवाइकांनासुद्धा सुधारण्यास सागण्यात आले. मात्र तो सुधारला नाही. त्यामुळे जनअदालतमध्ये त्याला शिक्षा देण्यात आली असून त्याला एक ठाणेदार जबाबदार असल्याचा उल्लेखदेखील त्या पत्रकात करण्यात आला आहे. अशोक तलांडे हा मुळचा दामरंचा येथील रहिवासी असला तरी तो मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीसोबत भामरागड तालुक्यातील ताडगाव परिसरात राहत होता. अशोक हा अत्यंत गरीब असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. त्याच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असल्याची माहिती आहे. अशोक हा पोलिस खबरी नसल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले आहे. या घटनेचा तपास ताडगाव पोलिस करत असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशत निर्माण झाली आहे.