शहीद पोलिसाच्या मुलाची दोन कोटींनी फसवणूक करणारा पुण्याचा आरोपी पकडला

74

गडचिरोली (Gadchiroli), ता. २२ : नोकरीचे आमिष दाखवून शहीद जवानांच्या कुटुंबाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलिस स्टेशन येथील पोलिस पथकांकडून २४ तासांच्या आत बेड्या ठोकण्यात आल्या. वर्ग-१ पदाच्या नोकरीसाठी तब्बल २ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक त्याने केली होती.प्राप्त माहितीनुसार गडचिरोली पोलिस दलात कार्यरत असताना सन २०१३ मध्ये तोडगट्टा जंगल परिसरात झालेल्या पोलिस आणि माओवादी चकमकीमध्ये पोलिस अंमलदार गणपत नेहरू मडावी हे शहीद झाले होते. शहीद अधिकारी व अंमलदार यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर शासनाकडून नोकरी देण्यात येत असते. यावरून शहीद गणपत मडावी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सागर गणपत मडावी याने अनुकंपा तत्त्वावर वर्ग-१ पदासाठी अर्ज सादर केला होता. या नोकरीसाठी शहीद गणपत मडावी यांच्या कुटुंबियांची सुमारे २ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक आरोपी ज्ञानेश्वर वरे याने केली.२००२ मध्ये सागर मडावी हा पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना यादरम्यान त्याची ओळख आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी वरे (वय ३०, रा. वरोडी खुर्द, ता. भोर, जि. पुणे) या व्यक्तीसोबत झाली.

यानंतर ज्ञानेश्वर वरे यास सागर याच्या अनुकंपा तत्त्वावरील नोकरीच्या प्रक्रियेबाबत माहिती मिळाली असता ज्ञानेश्वरने सागरला त्याची मंत्रालयात ओळख असून त्याला अनुकंपा तत्त्वावरील उप-जिल्हाधिकारी (वर्ग-१) पदाच्या नियुक्तीबाबत मदत करेल असे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांना पैसे देण्याच्या नावाने ज्ञानेश्वर वरे याने इतर चार आरोपींच्या मदतीने सागर व त्याची आई मीना गणपत मडावी यांची फसवणूक करून वेळोवेळी रोख स्वरूपात, फोन पे वरून तसेच सागरच्या बँक खात्याच्या एटीएममधून एकूण २ कोटी १६ लाख ७९ हजार १०० रुपये उकळले होते.यावरून २० एप्रिल २०२६ रोजी पहाटे गडचिरोली पोलिस स्टेशन येथे सागर मडावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी वरे व त्याचे ४ सहकारी अशा पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तपासाची चक्रे फिरवून आरोपीच्या ठावठिकाण्याची माहिती काढली व पोलिस पथकास तातडीने पुणे येथे रवाना करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान दौड व गडचिरोली पोलिस स्टेशन येथील सहायक पोलिस निरीक्षक विजय मुसनवार यांच्या नेतृत्वाखाली साक्षीदारांच्या व तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी वरे यास सोमवार (ता. २०) संध्याकाळी पो. स्टे. राजगड, जि. पुणे येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.आरोपी ज्ञानेश्वर वरे याला न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

यासोबतच इतर ४ फरार आरोपींचा शोध घेणे सुरू असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय मुसनवार करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज, सहायक पोलिस अधीक्षक निकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान दौड, विजय मुसनवार व अंमलदारांनी पार पाडली.

#गडचिरोली
#GadchiroliNews
#PoliceAction
#FraudCase
#JobScam
#CyberFraud
#CrimeNews
#BreakingNews
#PoliceInvestigation
#Arrested
#JusticeForVictims
#ScamAlert
#MaharashtraNews
#PuneCrime
#EconomicFraud
#CrimeUpdate
#LawAndOrder
#FraudAlert
#IndianPolice
#NewsUpdate

——————————————