वनपट्टेधारकांसाठी ॲग्रिस्टॅक अंतर्गत ‘फार्मर आयडी’ नोंदणीला सुरुवात

51
ई-केवायसीसाठी सेतूकेंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करा; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन

गडचिरोली (Gadchiroli) दि. २२ : जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सर्व पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लवकरात लवकर ई-केवायसी करून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार वनपट्टेधारकांची नावे ७/१२ उताऱ्यात ‘इतर हक्क’ या स्तंभाखाली नोंद असल्यामुळे त्यांना पूर्वी फार्मर आयडी मिळण्यात अडचणी येत होत्या. मात्र, शासनाने विशेष निर्णय घेतल्यामुळे आता वनपट्टेधारकांनाही फार्मर आयडी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

नोंदणीसाठी https://mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर किंवा “Farmer Registry MH” मोबाईल ॲपद्वारे प्रक्रिया करता येते. तसेच नागरिकांनी आपल्या जवळच्या सेतू केंद्रावर (CSC) जाऊनही नोंदणी करून घ्यावी. या प्रक्रियेत आधार क्रमांकाद्वारे ओटीपी किंवा बायोमेट्रिक पडताळणी करून ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
नोंदणी प्रक्रियेत ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर जमीन संलग्नता व ई-साईन करून अर्ज सादर केला जातो. त्यानंतर २४ ते ४८ तासांत फार्मर आयडी तयार होऊन लाभार्थ्यांच्या मोबाईलवर संदेशाद्वारे पाठविला जातो.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व संबंधित यंत्रणांना या प्रक्रियेसाठी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्या असून, वनपट्टेधारक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून फार्मर आयडी मिळवावा व विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवावा असे आवाहन केले आहे.

 

#FarmerID #AgriStack #FarmerRegistry #ForestRights #VanPatta #Shetkari #FarmersOfIndia #DigitalIndia #eKYC #CSC #MaharashtraFarmers #Gadchiroli #GovernmentSchemes #AgricultureIndia #RuralDevelopment #AadhaarLink #FarmerSupport #Krushi #IndianFarmers #GovtInitiative

————————————