माओवादी कॅम्पचा गडचिरोली पोलिसांनी केला पर्दाफाश.

75

 

गडचिरोली, ता. ३१ : गडचिरोली पोलिसांनी गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश करत शौर्यपूर्ण कामगिरी केली आहे.

कसनसूर-चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील छत्तीसगड- महाराष्ट्र सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ (उप पोलिस स्टेशन पेंढरीपासून १२ किमी पूर्वेला) तळ ठोकून असल्याची विश्वासार्ह माहिती २९ मार्चला रात्री उशिरा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान ) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथकाच्या जवानांद्वारे जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले. अभियान पथक शनिवारी सकाळी ४५० मीटर उंच टेकडीवर पोहोचले. त्यावेळी माओवादी नुकतेच या ठिकाणहून निघाले होते. डोंगरमाथ्यावरील ठिकाणावर शोधमोहीम राबविली असता त्याठिकाणी माओवाद्यांचे एक मोठे आश्रयस्थान आणि छावणी सापडली. तो कॅम्प अभियान पथकाद्वारे नष्ट करण्यात आला. जंगल परिसरात पुढील शोध सुरू करण्यात आला. परंतु अत्यंत खडतर प्रदेश आणि पर्वतांचा फायदा घेत माओवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी घटनास्थळावरून कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर्स, जिलेटिन स्टिक्स, बॅटरी, वॉकीटॉकी चार्जर, बॅकपॅक आदींसह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले. विशेष अभियान पथकाची सर्व पथके रविवारी ३१ मार्चला गडचिरोलीला सुखरूप पोहोचले आहे. छत्तीसगड सीमेवर माओवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली आहे.