गडचिरोली, ता. २६ : पोलिसांसोबत चकमकीसह अनेक हिंसक घटनांमध्ये सहभागी असलेल्या जहाल महिला माओवाद्यास गडचिरोली पोलिसांनी रविवार (ता. २५) भामरागड तालुक्यातील केडमारा जंगल परीसरात अटक केली. राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा (वय ३०), रा. बडा काकलेर, ता. भोपालपट्टनम,ल जि. बिजापूर (राज्य – छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या महिला माओवाद्याचे नाव आहे.
३० एप्रिल २०२३ रोजी केडमारा येथे झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. या चकमकीत ३ माओवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी कंठस्नान घातले होते. तसेच छत्तीसगड राज्याच्या बिजापूर जिल्ह्यातील तोयनार पोलिस स्शन येथील कचलाराम जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्येही तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.महाराष्ट्र शासनाने राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा हिच्या अटकेवर ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ७३ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनात पार पडली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे. राजेश्वर सन २००६ मध्ये चेतना नाट्य मंचामध्ये सदस्य या पदावर भरती होऊन माओवादी चळवळीत सक्रीय झाली.सन २०१०-११ मध्ये चेतना नाट्य मंचामध्ये उप-कमांडर या पदावर पदोन्नती झाली,सन २०१६ मध्ये फरसेगड दलममध्ये बदली होऊन सन २०१९ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती.सन २०१९ मध्ये पोलिस स्टेशन तोयनार, जि. बिजापूर (छत्तीसगड) च्या जंगल परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली होती.सन २०२० मध्ये कारागृहातून सुटका झाल्यानंतर आतापर्यंत टेलर टीम दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीअंतर्गत एसीएम (एरीया कमिटी मेंबर) पदावर कार्यरत होती.
राजेश्वरीने केलेले गुन्हे….
* चकमक – ४
* सन २०१६ मध्ये मौजा कर्रेमर्का, फरसेगड (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.
* सन २०१६ मध्ये मौजा मरेवाडा, भोपालपट्टनम (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.
* सन २०१८ मध्ये मौजा कचलाराम, बीजापूर (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.
* सन २०२३ मध्ये मौजा केडमारा, (भामरागड, जि. गडचिरोली) जंगल परिसरात गडचिरोली पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.