ग्लोबल गडचिरोली न्यूज पोर्टल,
गडचिरोली, ता. १४ : शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या आंबेशिवणी जवळील बामणी बीट क्रमांक ४११ मध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली असून तेंदूपत्ता तोडत असलेल्या एका वृद्ध महिलेवर वाघाने झडप घालून तिला ठार केले.ही घटना मंगळवार १४ मे रोजी सकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान घडली असून मृत महिलेचे नाव पार्वता बालाजी पाल (वय ६४) रा. आंबेशिवणी, असे आहे.
जिल्हाभरात सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू असून जवळपास एक आठवडा चालणाऱ्या या तेंदूपत्ता संकलनासाठी हजारो मजूर, शेतकरी जिवाची पर्वा न करता जंगल परिसरामध्ये तेंदुपत्ता संकलन करत असतात. या तेदुपत्ता संकलनावर त्यांचा वर्षभराचा बजेट अवलंबून असतो. मृत पार्वता पाल गावातील काही नागरिकांसह तेंदूपत्ता संकलन करत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. गावातील नागरिकांनी घटनेची माहिती गडचिरोली वनविभागाला दिली. वनविभागाच्या चमूने आंबेशिवणी येथील बामणी बीट क्रमांक ४११ मध्ये दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. गडचिरोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार अरुण फेडगे यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास सुरू आहे . पार्वता पाल यांच्या पश्चात पती, मुलगा , सुन, नातवंडे व बराच मोठा आप्त परीवार आहे. हल्लेखोर वाघाला जेरबंद करून मृताच्या कुटूंबाला तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे परीसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.