अवैध गौण खनिज उत्खननावर राहणार भरारी पथकाची नजर

64

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १६ : जिल्ह्यातील नदीपात्रातून व इतर ठिकाणाहून होणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर आळा घालण्याकरिता व शासकीय महसूलाचे नुकसान टाळण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जिल्हास्तरीय भरारी पथकाची नेमणूक केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननावर आता या भरारी पथकाची करडी नजर राहणार आहे.

या भरारी पथकात तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी आणि महसूल सहायक यांचा समावेश आहे. या भरारी पथकाला अवैध गौण खनिज उत्खननाबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तत्काळ कारवाई करणे, संबंधित ठिकाणी भेट देऊन मौका पंचनामा, जप्तीनामा करणे, उपस्थितांचे जवाब घेणे व उत्खनन झालेल्या ठिकाणाची संबंधित तालुक्याचे तहसीलदार, उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या उपस्थितीमध्ये मोजणी करून पंचनामे तयार करणे, कारवाईच्या वेळेस आवश्यकता वाटल्यास पोलिस संरक्षण घेणे, केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल अभिप्रायासह व अभिलेख जिल्हाधिकारी यांना तातडीने सादर करणे, प्राप्त तक्रारी व त्यावर केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने विहित नोंदवहीत नोंदी ठेवणे आदी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून संपूर्ण कार्यवाही दरम्यान गोपनीयता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रभारी जिल्हाधिकारी भाकरे यांच्या या आदेशामुळे अवैधरित्या गौण उत्खनन करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहे.