ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २४ : राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे २२ जून रोजी पत्नी संगीतासह आत्मसमर्पण करणारा नक्षल्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर याच्यासंदर्भात एक पत्रक जारी करून नक्षल्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने गिरीधरला ‘भगोडा’ म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरीधरने त्याच्या पत्नीसह आत्मसमर्पण केले. यासंदर्भात नक्षल्यांचा प्रवक्ता श्रीनिवासने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गिरीधर आणि त्याची पत्नी ४ जूनलाच माओवादी कम्युनिस्ट पक्षातून कुणालाही न सांगता पोलिसांकडे पळून गेले. गिरीधर मागील २८, तर संगीता ही २३ वर्षांपासून नक्षल चळवळीत कार्यरत होती. १९९६ मध्ये गिरीधर नक्षल चळवळीत सहभागी झाल्यापासून वेगवेगळ्या पदांवर काम करत त्याने दंडकारण्यातील उच्च पद प्राप्त केले. परंतु अलीकडे पोलिसांनी अनेक नक्षल नेत्यांना ठार केल्यानंतर माओवादी कम्युनिस्ट पक्षाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांचा सामना न करता घाबरलेल्या गिरीधरने पळ काढून पोलिसांपुढे शरणागती पत्करली, अशी टीकाही प्रवक्ता श्रीनिवास याने केली आहे. दिवंगत नक्षल नेते पेद्दीशंकर, जोगन्ना, मल्लेश, नर्मदाक्का, सृजनक्का, विकास, भास्कर, संजय, विनू, इंदिरा, वासू यांच्या कार्याचा उल्लेख करून श्रीनिवास याने गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल आंदोलनाच्या ४४ वर्षांच्या इतिहासात चळवळ सोडून पळणारा गिरीधर हा पहिलाही नाही आणि शेवटचाही नसेल, असेही त्याने म्हटले आहे.
——————————–