नामकरणाच्या अन्नातून बालकांसह २८ जणांना झाली विषबाधा

43

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ५ : बारशाच्या कार्यक्रमात तयार केलेल्या मांसाहारी जेवणातून विषबाधा होऊन पाच बालाकांसह २८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना गुरुवार ४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

धानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील छत्तीसगड सीमेवरच्या झाडापापडा ग्रामपंचायतीअंतर्गत रोपीनगट्टा येथे ही घटना घडली. रोपीनगट्टा येथील सुरगू मुरा टेकाम यांच्या नातीच्या नामकरण विधीचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित केला होता. यानिमित्ताने टेकाम परिवाराने खास मांसाहारी जेवण तयार केले होते. मात्र, पहिल्या पंगतीत जेवण केलेल्यांना १५ मिनिटांतच उलट्या, मळमळ, डोकेदुखी असा त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. दुसरी पंगत थांबविण्यात आली. प्रकृती अत्यवस्थ झालेल्या सर्व १८ जणांना पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर २२ जणांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून सहा जणांना छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथे हलविण्यात आले आहे. यातील तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.