घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या

55

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३० : मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली असून आपदग्रस्तांचे प्रचंड नुकसान झाले झाले. त्यामुळे तालुक्यातील सर्व पूरबाधीत गावांतील शेतीचे आणि घरांच्या पडझडीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षांच्या महिला नेत्या जयश्री जराते यांनी केली आहे.

सोमवारी गुरवळा, शिवनी, कृपाळा, वाकडी या गावांना भेटी देऊन पुरग्रस्त शेती आणि घरांच्या पडझडीची पाहणी केल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गडचिरोलीच्या तहसिलदारांना लिहिलेल्या पत्रात जयश्री जराते यांनी म्हटले आहे की, गुरवळा येथे भेट दिलेली असता सावित्राबाई सीताराम तुनकलवार यांचे घर पडून २ बैल जखमी , ७ कोंबड्यांचा मृत्यू तर मुलगा हरबाजी तुनकलवार यांच्या दुचाकी वाहनाची तुटफुट होऊन नुकसान झाले. अजय मेश्राम, पुनाजी भोयर, जोगेश्वर तुनकलवार यांचेही राहते घर पडून प्रचंड नुकसान झाले. तसेच शिवनी येथील पंढरी निकुरे, नारायण निकुरे, नामदेव निकुरे, नीलकंठ पेंदाम यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची शेती व रोवणे मागील आठवडाभरापासून पाण्याखाली आलेले असतानाही स्थानिक स्तरावर पंचनामे करण्यात आले नाहीत. त्यामुळे तालुक्यातील सर्व पूरबाधीत गावांतील शेतीचे व घर पडझडीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी वरीष्ठ कार्यालयाकडे तातडीने अहवाल पाठवावे, अशी मागणीही जयश्री जराते यांनी केली आहे.