वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना पोलिस कोठडी

63

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३० : एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी पोलिस मदत केंद्राअंतर्गत करपनफुंडी गावातील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचे प्रकरण सर्वत्र गाजत असून याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मनोज गोटा, शंकर गोटा, देवाजी गोटा व रामसू नरोटी अशी आरोपींची नावे आहेत. रैनू जंगली गोटा (६०) व बुर्गो रैनू गोटा (५५) हे दाम्पत्य करपनफुंडी गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील जांभिया आणि बांडे या दोन नद्यांच्या संगमानजीकच्या शेतावर असलेल्या झोपडीत राहत होते. परंतु शनिवारपासून दोघेही बेपत्ता होते. मंगळवारी (ता. २७) सकाळी १० वाजताच्या सुमारास नदीत बुर्गों गोटा या महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर २८ ऑगस्टला ८ किलोमीटर अंतरावर रैनू गोटा याचाही मृतदेह नदीत आढळून आला. सुरुवातीला गोटा यांच्या नातेवाइकांनी जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांचीही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला. परंतु पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील आरोपी मनोज गोटा, शंकर गोटा, देवाजी गोटा व रामसू नरोटी या चार आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीत आरोपींकडून मिळालेली माहिती, परीस्थितीजन्य पुरावे व पोलिसांच्या पुढील तपासातून या वृद्ध दाम्पत्याच्या हत्येच्या कारणांवर अधिक प्रकाश पडू शकेल.

————