गडचिरोली, ता. 11 शेतीचा कच्चामाल आपण परदेशात निर्यात करतो आणि तिकडचा पक्का माल आपण आपल्या देशात आयात करतो. शेती हमी भावाचा कायदा झाला पाहिजे. माती परीक्षण, बीज प्रक्रिया, शेतीपूरक जोडधंदे, पशुधन टिकवले पाहिजे. समस्यांवर उपाय शोधून आधुनिक पद्धतीने शेती करायला हवी, असे आवाहन विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष तसेच वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख करमसिंग राजपूत यांनी केले. विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या ४७ व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मागील ७० वर्षाच्या शेती व्यवस्थेवर त्यांनी प्रकाश टाकला आणि सध्या असलेल्या परिस्थितीवर त्यांनी उपाय सुचवले.
गोंडवाना विद्यापीठाचा पदव्युत्तर शैक्षणिक उपयोजित अर्थशास्त्र विभाग आणि विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिषदेचे उद्घाटन पार पडले.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. विशेष पाहुणे म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे, मानव विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली, नागपूरचे अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र भांडवलकर, विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. एच. ए. हुद्दा, उपाध्यक्ष डॉ. राजू श्रीरामे, नागपूर विभागाचे सचिव डॉ. विठ्ठल घिनमिने, अमरावती विभागाचे सचिव डॉ. संजय कोठारी, अर्थमिमांसाचे संपादक डॉ. धीरज कदम, अर्थशास्त्र विभागाच्या समन्वयक डॉ. शिल्पा आठवले आदींची उपस्थिती होती. परीषदेच्या उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते शोधनिबंध जर्नल तसेच अर्थमिमांसा शोधपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले की, अर्थशास्त्र परिषदेची सामान्य जणांना नेहमीच उत्सुकता असते. अर्थशास्त्र हा विषय आपल्या जगण्याचा भाग झालाय. सामान्यांना या परिषदेकडून मूलभूत संशोधनाची अपेक्षा असते. अनेक देशांमध्ये बेरोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. जर्मनीसारख्या देशात काम करण्यायोग्य तरुण कुशल मनुष्यबळाची गरज आहे. युरोपातल्या अनेक देशांमध्ये हीच अवस्था आहे. भारताकडे ४० हजार तरुण कुशल मनुष्यबळाची मागणी या देशांनी केली. शेतीवर चार महिने काम करणारा मजूर उद्योगधंद्यांमध्ये गेला पाहिजे. याचा विचार विदर्भ अर्थशास्त्र परिषदेने निश्चित केला पाहिजे. नव्या विचारांचे स्मरण विदर्भ अर्थशास्त्र परिषदेला होईल आणि विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल. जगाच्या इतिहासात विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. एच. ए. हुद्दा यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने प्रास्ताविक परिषदेचे सचिव डॉ. विठ्ठल घिनमिने यांनी , संचालन सहायक प्रा. डॉ. सविता सादमवार यांनी केले तर, आभार समनव्यक डॉ. शिल्पा आठवले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसमन्वयक स. प्रा.डॉ. अनंता गावंडे, डॉ. सुरेखा हजारे, डॉ. महिंद्र वर्धलवार, डॉ. धैर्यशील खामकर आदींनी सहकार्य केले. या दोन दिवसीय विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा व मंथन होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने नामवंत अर्थतज्ञ तसेच अर्थशास्त्राचे प्राध्यापक विस्तृत चर्चा आणि मार्गदर्शन करणार आहेत. यात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधी व विद्यार्थी संशोधकांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे, त्यांना संशोधनासाठी प्रेरणा मिळावी व शासनाला आर्थिक नीती तयार करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जबाबदारी….
शेतकऱ्यांना बाजारव्यवस्थेमध्ये त्यांच्या पिकाला रास्त किंमत का मिळत नाही, सगळ्यांना रोजगार का देऊ शकत नाही , माणूस महत्त्वाचा की तंत्रज्ञान, जे उत्पादन तयार होते त्याचे योग्य वितरण होते का, असे प्रश्न निर्माण होतात. अशा निर्माण झालेल्या प्रश्नांकडे संशोधन म्हणून पाहणे गरजेचे आहे. आधीच्या तज्ज्ञांनी केलेले संशोधन तुम्ही संदर्भ म्हणून वापरू शकता पण अर्थशास्त्रांचा अभ्यासक, संशोधक म्हणून काही प्रश्नांवर उत्तरे शोधणे आणि मीमांसा करणे ही आपली जबाबदारी आहे, असे मार्गदर्शन यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी केले.
—————————