गडचिरोली, ता. १५ : शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामध्ये खेळांप्रती उत्साह निर्माण व्हावा, याकरिता गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी तसेच संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील जवळपास ३५० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी १६ ते १८ असे तीन दिवस गोंडवाना विद्यापीठ परिसरात अमृत कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार १६ फेब्रवारीला सकाळी १० वाजता विद्यापीठ परिसरात होणार आहे. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून नागपुरच्या क्रीडा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, म्युझिकल मोटिव्हेशनल स्पीकर कैलाश तानकर, ज्येष्ठ कलावंत, नाटककार व दिग्दर्शक विरेंद्र गणवीर, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आदी उपस्थित राहणार आहेत. १८फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता या महोत्सवाचा समारोप व बक्षिस वितरण होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, विशेष पाहुणे म्हणून ज्येष्ठ झाडीपट्टी नाट्य कलावंत पद्मश्री परशुराम खुणे , अर्जुन पुरस्कार (अथलेटिक्स व पाॅवर लिफ्टिंग)प्राप्त विजय मुनिश्वर, प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या संयोजिक संचालक (प्र.)क्रीडा व शारीरिक शिक्षण डॉ. अनिता लोखंडे, विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ. प्रिया गेडाम आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले आहे. या महोत्सवात क्रीडा प्रकारात क्रिकेट, व्हॉलिबॉल, कबड्डी, रस्साखेच, रनिंग, संगीत खुर्ची, खो-खो, बॅडमिंटन अशा विविध सांघिक स्पर्,धा तर कला प्रकारात एकल व समूहागीत, समूह आणि एकल नृत्य, लघुनाटिका, एकपात्री या स्पर्धा होणार आहेत. कर्मचारी अशा क्रीडा व कला स्पर्धांमध्ये सहभागी होणार असल्यामुळे त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.
—————————