पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत रोजगार व स्वंयरोजगार मेळावा.

278

गडचिरोली, ता. १८ :

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत रोजगार व स्वंयरोजगार मेळावा, पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अत्याधुनिक संगणक कक्षाचे उद्घाटन तसेच प्रोजेक्ट प्रयासअतंर्गत घेण्यात आलेल्या परिक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या परीक्षेत २३ हजार ६४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी राज्या गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नागपुरच्या नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली परीक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, नागपुरच्या विशेष कृती दलाचे पोलिस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल आदींची प्रमुख उपस्थिती होती. रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यात गडचिरोली जिल्ह्रातील विविध ठिकाणाहून दुर्गम-अतिदुर्गम भागातील ६०० हुन अधिक युवक –युवती उपस्थित होते. स्किलिंग इन्स्टिट्युट पोलिस अधीक्षक कार्यालय गडचिरोलीमार्फत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण १५० युवती, वाहन चालक प्रशिक्षणाकरिता १३० युवती, वाजंत्री प्रशिक्षण १० गट, एम.एस.-सी.आय.टी. प्रशिक्षण १०० विद्यार्थी, वेब डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, मीडिया डेव्हलपर या कोर्सचे १५० प्रशिक्षणार्थी, सुरक्षा रक्षक प्रशिक्षण ६० विद्यार्थी, शिवणकाम प्रशिक्षण ३५ युवती, ब्युटी पार्लर प्रशिक्षण २५ युवती, प्रोजेक्ट प्रयासअंतर्गत घेण्यात आलेल्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी व समन्वयक शिक्षक, दिव्यांग बांधव, बीओआय स्टार आरसेटीमार्फत प्रशिक्षण घेत असलेले सी.सी.टी.व्ही. प्रशिक्षण ३५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. रोजगार मेळाव्यात विविध प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र, सी. सी. टी. व्ही. प्रमाणपत्र, वाहन चालक प्रशिक्षणार्थ्यांना लायसन्स, पोलिस भरती पुर्व प्रशिक्षणार्थ्यांना कीट साहित्य, शिवण काम प्रशिक्षणार्थ्यांना शिवणयंत्र, ब्युटी पार्लर प्रशिक्षणार्थींना ब्युटी पार्लर चेअर, दिव्यांगांना व्हिलचेअर, वाद्यवादक समुहास वाजंत्री साहित्य वाटप करण्यात आले. तसेच प्रोजेक्ट प्रयासअंतर्गत घेण्यात आलेल्या परिक्षेतील गुणवंतांना पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तिपत्र व रोख रक्कम बक्षिस देऊन स्वागत करण्यात आले. पुढे मार्गदर्शन करताना पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला म्हणाल्या की, तुम्ही चांगले शिक्षण घेतले तर तुमचा परिवार त्यातुन समाज आणि पर्यायाने देश उन्नत होणार आहे. तुम्हाला जे बनायचे आहे तुमचे जे ध्येय आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गडचिरोली पोलिस दल राबवित असलेल्या विविध कल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली. तसेच गडचिरोली पोलिस दलाने आतापर्यंत १० हजार ४०० हून अधिक युवक-युवतींना रोजगार व स्वंयरोजगार दिल्याचे सांगितले. या कार्यक्रमास गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नागपुरच्या नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली परीक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, नागपुरच्या विशेष कृती दलाचे पोलिस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश आदी उपस्थित होते.

———————————–