गडचिरोली पोलिस दलाने उधळला माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव

304
  • गडचिरोली, ता. १९ : गडचिरोली पोलिस दलाने प्रेशर कुकरमध्ये ठेवलेली स्फोटके निकामी करून माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळुन लावला आहे.
  • गडचिरोली जिल्ह्यात माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारची शस्त्रे व स्फोटक साहित्याचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनीयरीत्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरून ठेवतात. अशा पुरुन ठेवलेल्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताहात तसेच इतर प्रसंगी केला जातो. सोमवार (ता. १९) कुरखेडा उपविभागाअंतर्गत येत असलेल्या कोटगुल पोलिस स्टेशनपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या पहाडीच्या पायथ्याजवळ गोंडरी जंगल परीसराकडे जाणा­ऱ्या पायवाटेवर माओवाद्यांनी पोलिस पथकाला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहित्य पुरुन ठेवल्याची गोपनीय माहिती कोटगुलचे प्रभारी अधिकारी धनंजय कुलकर्णी यांना मिळाल्याने ही माहिती वरीष्ठांना कळविण्यात आली. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात त्या ठिकाणी बीडीडीएस (बाॅम्ब शोधक व नाशक पथक) पथकाला बोलविण्यात आले. बीडीडीएस पथकातील विविध अत्याधुनिक उपकरणाद्वारे जंगल परिसरात शोध घेत असताना एक संशयित जागा दिसली. या घटनास्थळाची पाहणी केली असता अंदाजे दीड ते दोन फुट जमिनीमध्ये खोलात स्फोटक पदार्थ भरून असलेले प्रेशर कुकर आढळून आले. त्याची बीडीडीएस पथकाकडून एक्सप्लोझीव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये अंदाजे २ किलो हाय एक्स्प्लोझीव्ह असल्याची खात्री झाल्याने वरीष्ठांच्या मार्गदर्शनात स्फोटक पदार्थ घटनास्थळावरच नष्ट करण्यात आले. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनात तसेच कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या नेतृत्वात कोटगुल पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी, बीडीडीएस पथकाचे प्रभारी अधिकारी मयूर पवार, पोलिस हवालदार पंकज हुलके, पोलिस हवालदार अनंतराव सोयाम, पोलिस अंमलदार सचिन लांजेवार, चालक पोलिस अंमलदार तिम्मा गुरनुले यांनी केली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कारवाईत सहभागी जवानांचे कौतुक केले. तसेच माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. माओवाद्यांनी माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.