युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना संमेलनाध्यक्ष डाॅ. किशोर कवठे, स्वागताध्यक्ष कुलगुरू डाॅ. प्रशांत बोकारे, ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. अभय बंग, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. रवींद्र शोभणे.

303

तरुणाईने मुस्कटदाबीला संविधानिक मार्गाने उत्तर द्यावे.डॉ.किशोर कवठे;

गडचिरोली, दि. २१:

  • युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन. (साहित्यव्रती गो. ना. मुनघाटे साहित्यनगरी),  देशापुढे धार्मिक झुंडशाही, राजकीय हुकुमशाही, औद्योगिक बेबंदशाही, अविवेकी सामाजिकता, अशी आव्हाने उभी आहेत. देशात पटापट होणारे राजकीय घटस्फोट, वाढती एकल धर्मांधता यामुळे भूमिका निर्माण होण्याच्या वयात, तरुणाईत संभ्रम आणि नकारात्मकता वाढीला लागली आहे. मात्र याचे फारसे प्रतिबिंब समकालीन साहित्यात उमटताना दिसत नाही. आदिवासीबहुल भागातील नवलेखकांनी स्वतःच्या जाणीवा शब्दबद्ध करणे महत्त्वाचे असून विद्यापीठानेही त्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तरुणाईने मुस्कटदाबीला संविधानिक मार्गानेच आजच्या समकालात उत्तरे दिली पाहिजेत, असे प्रतिपादन युवा साहित्य संमेलनाचे संमेलनाचे अध्यक्ष डॉ.किशोर कवठे यांनी केले.
  1. गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने स्थानिक सुमानंद सभागृहात दोनदिवसीय युवा साहित्य संमेलनाचे बुधवार (ता. २१) उद्घाटन झाले. सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. उद्घाटन सत्राला संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ.किशोर कवठे, स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, उद्घाटक व सत्कारमूर्ती ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग, प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, जागतिक साहित्याचे अभ्यासक प्रा. ज्ञानेश्वर गटकर, बांबू प्रशिक्षक मीनाक्षी वाळके, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आदींची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात दास्तांगोईचे सादरीकरण मुंबईचे अक्षय शिंपी व नेहा कुळकर्णी यांनी केले. ‘माडिया व गोंडी भाषा साहित्याचे संवर्धन’ या विषयावर सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांच्या अध्यक्षतेत परिसंवाद पार पडला. पत्रकार राजेश मडावी, माडीया व गोंडी भाषेचे अभ्यासक नंदकिशोर नैताम, सोनाली मडावी यांनी भाषा संवर्धनाच्या अंगाने मांडणी केली. तिस-या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक समन्वयक डॉ.सविता गोविंदवार, संचालन संशोधक करीश्मा राखुंडे, तर आभार सहायक प्रा.अमोल चव्हाण यांनी मानले.