गडचिरोली, ता. २९ :
दरवर्षी देशात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येते. या अनुषंगाने रविवार (ता. ३) राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील ८४ हजार १८१ बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. दावल साळवे यांनी २९ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परीषदेत दिली.पत्रकार परीषदेत या मोहिमेविषयी माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. साळवे म्हणाले की, जिल्ह्याची २०२४ ची मध्यवर्ती लोकसंख्या १२ लाख १५ हजार ६६६ असून ० ते ५ वयोगटातील लाभार्थी बालकांची संख्या ८४ हजार १८१ आहे. यात ग्रामीण भागांतील बालकांची संख्या ७६ हजार ९९५, तर शहरी भागातील बालकांची संख्या ७१८६ आहे. ग्रामीण भागांतील बालकांसाठी १ लाख ९४, तर शहरी भागांतील बालकांसाठी ९३३८, असे एकूण १ लाख ९ हजार ४३१ आवश्यक पोलिस डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात २१४५, तर शहरी भागात ४९ पल्स अशी एकूण २१९४ पोलिओ लसीकरण बूथ आहेत. याशिवाय १२१ पल्स पोलिओ ट्रांझिट टिम, १८४ पल्स पोलिओ मोबाईल टिम नेमण्यात आल्या आहेत. ही मोहीम आरोग्य विभागाचे ४२७ अधिकारी व ५७४९ कर्मचाऱ्यांमार्फत राबविण्यात येणार आहे. ही मोहीम ग्रामीण भागांत ३ दिवस, तर शहरी भागांत ५ दिवसांकरिता राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे संचलन नीट व्हावे यासाठी १४ फेब्रुवारीला जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी संजय मीणा व जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांच्या उपस्थितीत १५ फेब्रुवारीला जिल्हास्तरीय टास्क फोर्सची सभा घेण्यात आली होती. संपूर्ण तयारी झाली असून आपल्या बालकांना पोलिओ डोस पाजून मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. साळवे यांनी केले. या पत्रकार परीषदेला जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डाॅ. प्रफुल्ल हुलके, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. विनोद म्हशाखेत्री, नोडल अधिकारी डाॅ. पंकज हेमके, आरोग्य पर्यवेक्षक प्रवीण गेडाम उपस्थित होते.