गडचिरोली, ता. २९ : माओवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी पडू नका. त्यांचा विरोध करून पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केले.
पोलिस महासंचालक शुक्ला यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २९ फेब्रुवारीला अतिसंवेदनशील मन्नेराजाराम व भामरागड पोलिस स्टेशनला भेट दिली. यावेळी भामरागड कृषी मेळावा पार पडला. त्यांनी मन्नेराजाराम येथील जवानांची स्टॅण्ड टू ड्रिल घेतली व पोलिस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी करून उपस्थित अधिकारी व अंमलदार तसेच लहान मुले व नागरिकांसोबत संवाद साधला. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी व इतर जनतेने आपली आर्थिक प्रगती करावी व विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी आणि गडचिरोली पोलिस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे, यासाठी भामरागड पोलिस स्टेशन येथे पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कृषी मेळाव्या मार्गदर्शन केले. राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नागपुरच्या नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी मेळाव्यात उपस्थित नागरिकांना आंबा-४०, चिकू-४०, सीताफळ-४०, फणस-४०, लिंबू-४० आदी फळझाडांच्या रोपांचे तसेच शेतकऱ्यांना कृषी उपयोगी अवजारे (सब्बल, कृषी स्प्रेपंप, घमेले) साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधतांना पोलिस महासंचालक शुक्ला म्हणाल्या की, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी व इतर जनतेने आपली आर्थिक प्रगती करावी व विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी आणि गडचिरोली पोलिस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे. तसेच माओवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलिस दलाला सहकार्य करून गडचिरोली जिल्ह्राचा विकास साधावा, असे आवाहन केले. यासोबतच गावातील महिलांनी कृषी सहलीच्या माध्यमातून ज्ञान संपादन करून विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या कामामध्ये पुरुषांना हातभार लावून आपला व आपल्या परिवाराचा आर्थिक विकास साधावा, असेही त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा कार्यक्रमास हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. दिवसभर चाललेल्या या सर्व कायक्रमांमध्ये पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखिव पोलिस दलाच्या १९१ बटालियनचे कमांन्डंट एम. एस. खोब्राागडे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन)कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांचीही उपस्थिती होती.