हत्तींचा हैदोस गावात, ग्रामस्थ पोहोचले वनविभागाच्या दारात

251

गडचिरोली, ता. २९ : आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा, पळसगाव, शंकरनगर, जोगीसाखरा या गावांमध्ये मागील ६ महिन्यांपासून हत्तींच्या कळपाने हैदोस मांडल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवार २९ फेब्रुवारी रोजी वडसा उपवनसंरक्षक कार्यालयात धडक देत उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांना निवेदन दिले.

या गावांतील अनेक शेतकऱ्यांनी मका, कारले, धान, टमाटर व इतर पिकांची लागवड केली असून हत्तींमुळे या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वनविभागाकडून फक्त हत्तींचे लोकेशन सांगितले जाते. परंतु त्यांच्यावर नियंत्रण केले जात नाही. आता अवघ्या १५ दिवसांत मोहफूल व तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू होणार आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी सोलर कुंपण योजनेअंतर्गत शेतकन्यांकडून सात-बारा वेळोवेळी मागूनही लाभ मिळालेला नाही, हत्तींच्या हैदोसामुळे शाळकरी मुलांनासुद्धा धास्ती भरली आहे. वनविभागाकडून शेतपिकांचे पंचनामे करताना काटकसर केली जाते व विलंब केला जातो. त्यामुळे नुकसानीनुसार लाभ मिळत नाही नसल्यामुळे गडचिरोली जिल्हा अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप ठाकुर व सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपवनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडक देऊन हत्तींचा तत्काळ बंदोबस्त करून आणि हत्तींनी नुकसान केलेल्या पिकाची शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देण्यात यावी.तत्काळ कार्यवाही न झाल्यास ८ दिवसांत आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी उपवनसंरक्षक सालविठ्ठल म्हणाले की, आठ दिवसांत हत्ती परीसरातून बाहेर काढून शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी मोतीराम लिंगायत, गोपाल दोनाडकर, आनंदराव राऊत, मोरेश्वर मेत्राम, शेखर बगमारे, हरीचंद ठाकरे, उत्तम माझी, देवाशीष मंडल, रेवनाथ प्रधान, सूरज दिघोरे, सीताराम प्रधान, नथ्थू ढोगे, दीपक सरदार, सुभाष घुटके, हरीदास आबोने, प्रफुल्ल मेत्राम, पुरषोत्तम मेत्राम, शालिक मेत्राम, हाजू मंडल, मनोज चहांदे, अजय मेत्राम, गौतम बनकर, सिद्धार्थ घुटके, रोहीत मिस्त्री, तारापद मिस्त्री, भोला मंडल, पुरुषोत्तम मैद, मंगल प्रधान, सूरज दिघोरे, शेखर बगमारे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.