चपराळ्यात महाशिवरात्रीच्या यात्रेच्या बंदोबस्तात तैनात सहायक पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

273

गडचिरोली, ता. ८ : जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रेत पोलिस बंदोबस्तात तैनात असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचा शुक्रवार (ता. ८) सायंकाळी ४. ३० वाजता मृत्यू झाला. भैय्याजी पत्रू नैताम (वय ५२), रा. कोपरल्ली, ता. मुलचेरा, असे मृताचे नाव आहे.

राजाराम खांदला येथील उप पोलिस स्टेशन येथे कर्तव्यावर असलेलेल सहायक पोलिस निरीक्षक भैय्याजी नैताम यांना चपराळा येथील महाशिवरात्रीच्या यात्रेत बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले. शुक्रवारी चार वाजताच्या सुमारास यात्रेत कर्तव्यावर असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तत्काळ आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृलयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचा अंदाज डाॅक्टरांनी व्यक्त केला. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात आष्टी पोलिस करत आहेत. सहायकपोलिस निरीक्षक भैय्याजी नैताम यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी कोपरल्ली येथे पाठवण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्त परीवार आहे.

——————————