आधारविश्व फाउंडेशनतर्फे पर्यावरणपूरक होळी

190

सतत ७ वर्षापासून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या आधारविश्व फाउंडेशनतर्फे सेमाना मंदिर परीसराची स्वछता करत कचऱ्याची होळी करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा आधारविश्व फाउंडेशनतर्फे रविवारी २४ मार्च रोजी पहाटे ५. ३० वाजता आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे यांच्या नेतृत्वात होळीनिमित्त साफसफाई अभियान राबविण्यात आले. पहाटे ५.३० वाजता मंदिर परिसरातील स्वछतेला सुरुवात झाली. दर शनिवारी भाविक मोठ्या प्रमाणात स्वयंपाकाला येतात. परंतु जेवण झाल्यावर प्लास्टिक ताट, वाट्या, ग्लास तिथेच फेकून देतात. तसेच काही समाजकंटक लोकांनी पार्ट्या करून दारूच्या बाटल्यासुद्धा फेकलेल्या होत्या. आधारविश्व फाउंडेशनच्या सदस्यांनी सर्व कचरा वेगवेगळा केला.प्लॅस्टिकचा कचरा तसेच भंगार पोत्यात भरून मंदिर समितीच्या स्वाधीन केला आणि इतर कचरा जाळून पर्यावरणपूरक होळी साजरी केली. भाविकांनी स्वयंपाक जरूर करावा परंतु जेवण झाल्यावर प्लॅस्टिक ताट, वाट्या तसेच उरलेले अन्न तिथेच न फेकता कचराकुंडीत जमा करावे व मंदिर परिसरातील प्रदूषण टाळावे. समाजकंटकांनी दारूच्या पार्ट्या करताना हे पवित्र देवस्थान आहे याचे तरी भान ठेवावे, असे आवाहन आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे यांनी केले आहे. या उपक्रमासाठी आधारविश्व फाउंडेशनच्या उपाध्यक्ष वीणा जंबेवार, सचिव सुनीता साळवे, सदस्य विजया मने, मीरा कोलते, सुलभा धामोडे, सुनीता आलेवार, संगीता राऊत, सीमा कन्नमवार, रोशनी राजुरकर, उज्ज्वला चन्नावार, कीर्ती हर्षे , ज्येष्ठ पत्रकार अनिल धामोडे, सुशील हिंगे, राहुल कन्नमवार, मनोज राजूरकर आदींनी सहकार्य केले.