गडचिरोली-चिमुर लोकसभेच्या रिंगणात १० उमेदवार

93

गडचिरोली, ता. ३० : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ अंतर्गत गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा पुढचा टप्पा सुरू झाला असून या निवडणुकीच्या रिंगणात १० उमेदवार राहतील. नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी ३० मार्च २०२४ रोजी मिलिंद नरोटे व हरिदास बारेकर या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाकरिता आता दहा उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. दरम्यान सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटपदेखील करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी माहिती दिली.

नामनिर्देश अर्ज मागे घेतल्यानंतर आता गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार अशोक महादेवराव नेते (भारतीय जनता पक्ष, चिन्ह – कमळ), डॉ. नामदेव दसाराम किरसान (इंडियन नॅशनल काँग्रेस चिन्ह- हात), योगेश नामदेवराव गोन्नाडे ( बहुजन समाज पक्ष चिन्ह- हत्ती), नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार धीरज पुरुषोत्तम शेडमागे ( जनसेवा गोंडवाना पक्ष चिन्ह- करवत), बारीकराव धर्माजी मडावी ( बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पक्ष चिन्ह -शिट्टी), सुहास उमेश कुमरे (भीमसेना चिन्ह-ऑटोरिक्षा), हितेश पांडूरंग मडावी (वंचित बहुजन आघाडी चिन्ह- गॅस सिलेंडर), तर अपक्ष उमेदवारांमध्ये करण सुरेश सयाम (चिन्ह- ऊस शेतकरी), विलास शामराव कोडापे (चिन्ह- दूरदर्शन), विनोद गुरुदास मडावी ( चिन्ह- अंगठी) यांचा समावेश आहे.