रस्त्याच्या कडेला अचानक उलटली बस; वाहकासह २ महिला प्रवासी गंभीर

103

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २५ : अहेरी येथून अमरावती जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस पुढुन येणाऱ्या वाहनाला साईड देताना रस्त्याच्या कडेला खोल भागात उलटल्याने वाहकासह दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवार २५ मे २०२४ सकाळी १० वाजता लगाम ते आष्टी रस्त्यावरील धनुर जवळच्या वनविभागाच्या नाक्या जवळ घडली. या अपघातातील जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार अहेरी आगाराची एम एच-०७ सी-९४६३ क्रमांकाची बस जवळपास २७ प्रवाशांना घेऊन शनिवारी सकाळी ८.३० वजता अमरावतीकरिता निघाली. अहेरीवरून वर्धामार्गे ही बस अमरावतीला जाते. अहेरीवरून जवळपास ३५ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील धनुर जवळच्या वनविभागाच्या नाक्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना बाजूला खोल भागात उलटली. या बसमध्ये चालक पी. आर. मेश्राम आणि वाहक डी. एस. मेश्राम होते. तसेच बसमध्ये जवळपास २७ प्रवासी होते. या अपघातात वाहक डी. एस. मेश्राम आणि दोन महिला प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णवाहिकेने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये वाहक असलेले डी. एस. मेश्राम यांची मुलगीसुद्धा प्रवास करत होती. तिलासुद्धा दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अहेरी आगाराचे व्यवस्थापक चंद्रभूषण घागरगुंडे यांनी घटनास्थळ घाटून परिस्थितीचा आढावा घेत उर्वरीत प्रवाशांची विचारपूस केली. तसेच या बसमधील प्रवाशांना इतर वाहनाने पुढे पाठविले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे काही वेळासाठी या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती.