वादळात दुचाकीवर वृक्ष कोसळून पती ठार, पत्नी सुदैवाने बचावली

103

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली,ता. १५ : तालुक्यातील उडेरा-बुर्गी गावाजवळ रस्त्यावरून स्वतःच्या दुचाकीने प्रवास करताना वादळात अवाढव्य वृक्ष दुचाकीवर कोसळून नेवलू मासू गावडे (वय ४०) रा. पुरसलगोंदी याचा जागीच मृत्यू झाला, तर लघुशंकेसाठी आधीच दुचाकीवरून उतरलेली त्याची पत्नी पोवरी नेवलू गावडे सुदैवाने बचावली. ही दुर्दैवी घटना १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.

नवलू गावडे व त्याची पत्नी पोवरी हे दोघेही १४ जून रोजी पुरसलगोंदी गावावरून एका लग्न समारंभासाठी करपनफुंडी गावी एम. एच. ३३ ए. इ. ६२८२ क्रमांकच्या दुचाकीने जात होते. त्यावेळी उडेरा ते बुर्गी गावाच्यामध्ये पोहचले असता अचानक वादळ वाऱ्यासह पाऊस पडायला सुरवात झाली, वाटेतच पत्नी पोवरी लघुशंकेसाठी दुचाकीवरून खाली उतरली, नेवलू मात्र जरा पुढे जाऊन थांबण्याच्या बेतात असतानाच जोरदार आलेल्या वादळात रस्त्याच्या कडेचा वृक्ष नेवलू चालवत असलेल्या दुचाकीच्या मधोमध नेवलूच्या कमरेवरच कोसळला, या अवाढव्य वृक्षाखाली दुचाकीसह दबून नेवलूचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या माहितीवरून बुर्गी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. नेवलु गावडे यांना पत्नी, दोन मुली, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सरकारने नेवलूच्या परीवाराला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी नातेवाइक व नागरिकांनी केली आहे.