माओवाद्यांच्या विरोधात ग्रामस्थ, सात गावांनी केली गावबंदी

82

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १६ : जिल्ह्यातील भामरागड उपविभागाअंतर्गत धोडराज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सात गावांनी केली माओवाद्यांना गावबंदी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार माओवादाचे समुळ उच्चाटन क

रण्यासाठी शासन विविध योजना राबवित असते. सन २००३ पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिस दलामार्फत पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडानअंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांच्या लाभामुळे शुक्रवार (ता. १४) भामरागड उपविभागातील धोडराज पोलिस स्टेशन येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये हद्दीतील परायनार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात गावांतील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानूमते नक्षल गावबंदी करून त्याबाबतचा ठराव धोडराज पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सादर केला. ही सात गावे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्याने या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. तसेच गावातील काही सदस्यांचा माओवाद्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील नागरिक हे शासनाप्रती उदासीन होते. परंतू मागील तीन वर्षामध्ये गडचिरोली पोलिस दल पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडानअंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे आदींच्या माध्यमातून येथील गावकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात यशस्वी झाल्याने पोलिस दलाच्या प्रती येथील गावकऱ्यांचा विश्वास दृढ झाला. यासोबतच अलीकडील काळात या परिसरात ईरपनार येथील मोबाईल टॉवरची उभारणी करण्याकरिता आलेल्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांची माओवाद्यांकडून करण्यात आलेली जाळपोळ व इतर साहित्यांचे केलेले नुकसान, माओवाद्यांकडून पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून करण्यात आलेल्या निष्पाप गावकऱ्यांच्या हत्या व मारहाण, नुकसानीच्या विविध घटना, गावांच्या विकासकामात करण्यात येणारा अडथळा, जनतेला दाखविण्यात येणारा धाक आदी घटनांमुळे माओवादी जनतेची दिशाभूल करत आहेत, हे गावक­ऱ्यांच्या लक्षात आले. त्याचाच परिपाक म्हणून शुक्रवारी धोडराज येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यात या सात गावांतील गावकऱ्यांनी हा माओवादी गावबंदी ठराव संमत केला. तसेच यापूढे गावामार्फत कोणत्याही माओवादी संघटनेस जेवण/राशन/पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही, गावातील नागरिक स्वत: किंवा त्यांच्या मुलाबाळांना माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही, माओवाद्यांच्या मिटींगला जाणार नाही तसेच माओवाद्यांना खोट्या प्रचारास बळी पडणार नाही, असे सांगितले. यावेळी मिळदापल्ली येथील गावकऱ्यांनी माओवाद्यांनी पोलिस पथकाला नुकसान पोहचविण्याच्या उद्देशाने खड्डे करून त्यात पुरून ठेवलेल्या धारदार लोखंडी सळाखी काढून आणून पोलिस दलाकडे सुपूर्द केली. ही कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यास भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, धोडराज पोलिस स्शन येथील प्रभारी अधिकारी शरद काकळीज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. माओवाद्यांना गावबंदी ठराव करणाऱ्या सात गावांतील नागरिकांचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभिनंदन केले असून अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांनी माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे. गडचिरोली पोलिस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्यास माओवादी मुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.