10 लाख रुपयांचे बक्षिस असलेल्या दोन जहाल माओवाद्यांना केली अटक

115

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ९ : सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवायांमध्ये सक्रिय सहभागी असलेल्या दोन जहाल माओवाद्यांना मंगळवार (ता. ९) गडचिरोली पोलिस दलाने अटक केली. गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ८१ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे.

भामरागड उपविभागाअंतर्गत धोडराज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जंगल परीसरामध्ये प्राणहिताच्या विशेष अभियान पथकाचे जवान माओवादविरोधी अभियान राबवत असताना त्यांना दोन संशयित व्यक्ती घातपात करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळून आले. जवानांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांनंतर त्यांची अधिक सखोल चौकशी केली असता त्यांची नावे रवी मुरा पल्लो (अॅक्शन टिम कमांडर) (वय ३३)रा. कवंडे, ता. भामरागड, जि. गडचिरोली, दोबा कोरके वड्डे (पार्टी सदस्य, भामरागड दलम) (वय ३१) रा. कवंडे, ता. भामरागड, जि. गडचिरोली, अशी असून या दोघांचा नोव्हेंबर २०२३ मध्ये पेनगुंडा येथे झालेल्या दिनेश गावडे या निरपराध व्यक्तीच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. यातील रवी मुरा पल्लो सन २०१६ पासून जनमिलिशीया पदावर भरती होऊन माओवाद्यांची कामे करत होता. २०१८ पासून अॅक्शन टिम सदस्य म्हणून काम करत होता. २०२२ मध्ये अॅक्शन टिम कमांडर म्हणून बढती मिळूनआजपर्यंत कार्यरत होता. त्याच्यावर आजपर्यंत एकूण ६ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १ चकमक, १ जाळपोळ, ३ खून व १ स्फोटाच्या गुन्ह्याचा समावेश आहे. दोबा कोरके वड्डे याने २००८पासून जनमिलिशिया पदावर भरती होऊन माओवाद्यांचे काम सुरू केले. २०१९ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत कार्यरत होता. आजपर्यंत एकूण १८ गुन् त्याच्यावर दाखल असून त्यामध्ये ५ चकमकी, ७ खून व इतर ६ गुन्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने रवी मुरा पल्लोच्या अटकेवर ८ लाख, तर दोबा कोरके वड्डे याच्या अटकेवर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश तसेच पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात विशेष अभियान पथक, प्राणहिताच्या जवानांनी पार पाडली.

—————————————–