गडचिरोली जिल्हयात कार्यकाळ पुर्ण केलेल्या 47 पोलीस अधिकारी यांचा निरोप समारंभ पार पडला

86

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. १३ : गडचिरोली जिल्ह्यात आव्हानात्मक व खडतर सेवा पूर्ण केलेल्या ४७ पोलिस अधिकाऱ्यांची इतर जिल्ह्यांमध्ये बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ शनिवार (ता. १३) पार पडला.

गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने पोलिस दादालोरा खिडकीअंतर्गत शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याऱ्या अधिकारी/अंमलदारांकरिता पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात कम्युनिटी डेव्हलेपमेंट ऑफीसर ऑफ द मंथ हा उपक्रम दरमहा राबविण्यात येतो. याच माध्यमातून जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत पोलिस अधिकारी. अंमलदारांनी वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक व्हावे यासाठी कम्युनिटी डेव्हलेपमेंट ऑफीसर ऑफ द इयर वार्षिक सन्मान सोहळासुद्धा यावेळी पार पडला. गडचिरोली जिल्ह्याती १० पोलिस निरीक्षक, ५ सहायक पोलिस निरीक्षक व ३२ पोलिस उपनिरीक्षकांची बदली झाली आहे. याबद्दल पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करत असताना आलेले अनुभव कथन केले. तसेच गडचिरोलीसारख्या माओवाद प्रभावीत जिल्ह्यात कशाप्रकारे आव्हानांना सामोरे जावे लागते व या ठिकाणी केलेल्या खडतर कामाचा अनुभव नक्कीच भावी वाटचालीसाठी उपयोगी पडेल. असे सांगत गडचिरोली पोलिस दलाचे आभार व्यक्त केले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. २०२३ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी,अंमलदारांना उत्कृष्ट व विशेष कामगिरीसाठी कम्युनिटी डेव्हलेपमेंट ऑफीसर ऑफ द इयर -२०२३ च्या माध्यमातून गौरविण्यात आले. उत्कृष्ट उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय म्हणुन उपविभाग पेंढरीची निवड करण्यात आली. पेंढरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांना दहा हजार रुपये रोख व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रथम क्रमांक पोलिस स्टेशन मुलचेरा, द्वितीय क्रमांक पोलिस स्टेशन सिरोंचा, तृतीय क्रमांक पोलिस स्टेशन पुराडा यांनी पटकाविला. उत्कृष्ट कामगिरी (कृषी समृद्धी योजना) करिता ताडगाव पोलिस मदत केंद्राला पाच हजार रुपये रोख व प्रशस्तिपत्र, विशेष कामगिरी (कृषी समृद्धी योजना) करिता मुरूमगाव पोलिस स्टेशनला तीन हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र, उत्कृष्ट कामगिरी (रोजगार व स्वयंरोजगार) करिता बेडगाव पोलिस मदत केंद्र, विशेष कामगिरी (रोजगार व स्वयंरोजगार) करीता दामरंचा उप पोलिस, उत्कृष्ट कामगिरी (शासकीय योजना) करिता राजाराम (खां) उप पोलिस स्टेशन राजाराम (खां.), विशेष कामगिरी (शासकीय योजना) करिता घोट पोलिस मदत केंद्र घोट, उत्कृष्ट नावीन्यपूर्ण योजनेकरिता कोटगुल पोलिस स्टेशन कोटगुल यांना सन्मानित करण्यात आले. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या संपूर्ण वर्षात एकूण २ लाख ४६ हजार ३६२ लोकांपर्यंत विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात गडचिरोली पोलिस दल यशस्वी झाले आहे. प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र ७६१२, प्रोजेक्ट विकास अंतर्गत विविध प्रकारच्या योजना ४०१२६, विविध प्रकारचे दाखले १८८६७२, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा १८३, रोजगार व व्होकेशनल ट्रेनिंग १७६६, प्रोजेक्ट कृषी समृद्धी अंतर्गत ६५४९, प्रोजेक्ट शक्ती ५८० व इतर उपक्रम ५६१ यांचा समावेश आहे.

———————————–