पोलिस अधीक्षकांच्या उत्कृष्ट नियोजनात पोलिस भरतीची शारीरिक चाचणी पूर्ण

81

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १३ : गडचिरोली पोलिस दलामार्फत चालक पोलिस शिपाई १० जागांसाठी तसेच गडचिरोली पोलिस शिपाई ९१२ जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून दोन्ही भरतींकरिता मैदानी (शारीरिक) चाचणी १९ जूनपासून प्रारंभ होऊन आज १३ जुलै २०२४ रोजी गडचिरोली पोलिस मुख्यालयातील पोलिस कवायत मैदान येथे पार पडली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शन व नियोजनात या भरती प्रक्रियेचा हा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पात्र उमेदवारांच्या लेखी परीक्षेची दिनांक लवकरच कळवण्यात येणार आहे.

गडचिरोली चालक पोलिस शिपाईच्या १० पदांकरिता २२५८ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले होते. त्यापैकी १५६१ पुरुष व २६७ महिला उमेदवार शारीरिक चाचणीकरिता हजर आले. त्यापैकी १३६३ पुरुष व १७६ महिला उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी दिली. यासोबतच या उमेदवारांची वाहन कौशल्य चाचणी एम.आय.डी.सी. मैदानावर प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली (आरटीओ) यांच्या समक्ष पार पडली. तसेच पोलिस शिपाईच्या ९१२ पदांकरिता एकूण २४५७० उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी १३३४२ पुरुष उमेदवार व ६४०० महिला उमेदवार हजर आले व त्यापैकी ११८२६ पुरुष व ५३०८ 5महिला उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी दिली. ही पदभरती प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात आली. यामध्ये उमेदवारांची छाती-उंची या शारीरिक मोजणीकरिता पीएसटी (PST) Digital Physical Standard Test तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. तसेच उमेदवारांची १६०० मीटर धावणे (पुरुष), ८०० मीटर धावणे (महिला), १०० मीटर धावणे (पुरुष व महिला) च्या चाचणीकरिता (RFID) Based Technology चा वापर करण्यात आला. यासोबतच गोळा फेक चाचणीकरीता Prism Technology चा वापर करण्यात आला. उमेदवारांना मैदानी चाचणी दरम्यान काही दुखापत झाल्यास तत्काळ उपचार होण्याकरिता मैदानातच रुग्णालयाची सोय करण्यात आली. तसेच इतर काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या समक्ष प्रत्यक्षरित्या करण्यात आले. मैदानी चाचणी दिलेल्या सर्व उमेदवारांच्या गुणतालिकेची यादी व लेखी परीक्षेकरिता पात्र झालेल्या उमेदवारांची यादी तसेच लेखी परीक्षेचा दिनांक लवकरच गडचिरोली पोलिस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली आहे.