रानमुडझा येथील मामा तलावाची पाळ फुटली, चिखल तुडवत माजी खा.अशोक नेते पोहोचले बांधावर.

72

मच्छीमार सोसायटीसह शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दि.२५ जुलै २०२४

 

गडचिरोली : शहरापासून ९ कि.मी.अंतरावर असलेल्या रानमुडझा या गावातील मामा तलावाची पाळ आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास फुटल्याने हाहाकार उडाला. दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने मच्छीमार सोसायटीसह लगतच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते यांनी एक किलोमीटर चिखलाच्या मार्गाने पायी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडताच नेते यांनी जिल्हाधिकारी संजय दैने आणि लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना माहिती देऊन पाणी थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत नुकसानभरपाई देण्याची सूचना केली.

 

विशेष म्हणजे या तलावातून लगतच्या दोन गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीलाही आवश्यकतेनुसार पाणी मिळते. पण पाणी वाहून गेल्यामुळे त्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तातडीने पाळ दुरूस्त करून तलावात पाणी साचण्याची व्यवस्था करावी अशी मागणी माजी खा.नेते यांनी केली आहे.

 

या मामा तलावातील मासे अंदाजे तीन ते चार लाखांच्या घरात होते. याशिवाय यावर्षी टाकलेली बिजाई दिड लाख रुपयांची होती. पण तलावातील संपूर्ण पाणी वाहून गेल्याने सदर मच्छीमार सोसायटीचे अंदाजे पाच ते साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय वाहात जाणारे पाणी शेतातील पिकांना खरडून काढत वाहात गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा तातडीने पंचनामा करून सर्व संबंधितांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी खा.अशोक यांनी प्रशासनाला केली.

 

यावेळी तलावाची पाहणी करताना मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण शेंडे, कार्याध्यक्ष विठ्ठल भोयर, प्रभाकर भोयर, अजय शेरकी, सुरूदास भोयर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर गावकरी उपस्थित होते.

 

*नेते यांनी केली शिवणी नदीवरच्या पुराची पाहणी….*

गेल्या पाच दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसाने आणि गोसीखुर्द धरणाचे दरवाज़े उघडून सुरू असलेल्या विसर्गामुळे मोठया प्रमाणात नद्यांना पूर आला. पुराचे पाणी नदीचे पात्र सोडून बाहेर आले. अनेक ठिकाणी मुख्य मार्गावरचे पूलही पाण्याखाली गेल्याने रस्त्यांवरची वाहतूक खोळंबून आहे. अनेक गावा़चा संपर्क तुटला आहे. आज दि.25 रोजी चामोर्शी मार्गावरच्या शिवणी नाल्यामुळे आलेल्या पुराची माजी खा.अशोक नेते यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांची उपजीविका ज्या शेतीवर चालते ती शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने झालेले नुकसान मोठे आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांसह सर्व नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची कल्पना त्यांना दिली असल्याचेही नेते यांनी सांगितले.