आत्मसमर्पित महिला माओवादी पोलिसांच्या पुढाकाराने लग्नबंधनात अडकली

162

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १६ : गडचिरोली पोलिस दलाच्या सहकार्याने आत्मसमर्पित महिला माओवादी रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी ही लग्नबंधनात अडकली आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदिरात पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे तिचा लग्न सोहळा १६ आॅगस्ट रोजी पार पडला.

प्राप्त माहितीनुसार शासनाने सन २००५ पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरीष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर जे माओवादी विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतात त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदतीचा हात पुढे करत असते. याचाच एक भाग म्हणून मागील वर्षी आत्मसमर्पित झालेली जहाल महिला माओवादी रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिचा एलाराम येथील कैलाश मारा मडावी याच्यासोबत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत व पुढाकाराने शुक्रवारी विवाह संपन्न झाला. सलग १४ वर्षे माओवाद्यांच्या विविध सशस्त्र माओवादी दलममध्ये कार्यरत राहून एरीया कमिटी मेंबर पदापर्यत पोहचलेली जहाल महिला माओवादी रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी ( वय २८)रा. ईरुपगुट्टा, पो. भोपालपट्टनम जि. बिजापूर (छत्तीसगड) हिने गडचिरोली पोलिस दलामार्फत राबविल्या जाणा­ऱ्या योजना व सामाजिक उपक्रमांच्या प्रभावशाली अंमलबजावणीमुळे तसेच गडचिरोली पोलिस दलाच्या तीव्र माओवादीविरोधी अभियानांमुळे व हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून मागील वर्षी ७ आॅक्टोबर २०२३ रोजी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या समोर आत्मसमर्पण केले होते. रजनीवर महाराष्ट्र व छत्तीसगड शासनाचे मिळून एकूण ११ लाख रुपयांचे इनाम घोषित होते. आत्मसमर्पण केल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच आत्मसमर्पितांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामिल करून घेण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सदैव प्रयत्नशील असते. गडचिरोली जिल्ह्यातील शेती करून सर्व सामान्य आयुष्य जगणारा तरुण कैलास मारा मडावी (वय २६) रा. एलाराम, पो. पेठा (देचलीपेठा), ता. अहेरी जि. गडचिरोली याने व रजनी या दोघांनी परस्पर संमतीने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला गडचिरोली पोलिस दलाने पाठिंबा देऊन त्या दोघांचे पुढील आयुष्य सुखासमाधानाचे जाण्याकरिता शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदिरात विवाह लावून दिला. याप्रसंगी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख व इतर वरिष्ठ अधिकारी व अंमलदारांची उपस्थिती होती. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी उभयतांना आशीर्वाद देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा विवाह संपन्न होण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनात आत्मसर्मपण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिवाल व अंमलदार, विविध शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदारांनी परिश्रम घेतले.

—————————————-