ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली : मुंबईतील फोर्टिस समूहातील एस.एल. रहेजा हॉस्पिटलने गडचिरोली जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटल, चंद्रपूर रोड येथे ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २०२४ रोजी दोन दिवसीय मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले. या शिबिरामध्ये क्लेफ्ट लिप पॅलेट (फाटलेला ओठ व टाळू) आणि जन्मजात हृदयदोष असलेल्या मुलांसाठी तपासण्या करण्यात आल्या. या उपक्रमामुळे २६ मुलांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे निदान झाले.
या शिबिराचे आयोजन एस.एल. रहेजा हॉस्पिटलने स्पंदन फाउंडेशनच्या सहकार्याने केले होते. ०-१८ वयोगटातील ९६ मुलांनी या शिबिरात सहभाग घेतला. क्लेफ्ट लिप पॅलेट शिबिराचे नेतृत्व डॉ. तौफिक बोहरा यांनी केले, तर पीडिअॅट्रिक कार्डिओलॉजी विभागाचे नेतृत्व डॉ. रौनक सेठ आणि डॉ. श्यामदीप बोर्गोहेन यांनी, डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
एस.एल. रहेजा हॉस्पिटलचे सीईओ डॉ. कुणाल पुनामिया म्हणाले, “या उपक्रमामुळे बालरुग्णांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणण्यास आम्हाला मदत होईल. आमचे लक्ष्य दर्जेदार पीडिअॅट्रिक सेवा देऊन, या भागातील मुलांच्या आरोग्य समस्यांचे समाधान करणे आहे.”
या शिबिरानंतर, एस.एल. रहेजा हॉस्पिटल गडचिरोलीतील मुलांसाठी क्लेफ्ट लिप शस्त्रक्रिया व हृदयदोषाच्या उपचारांची सेवा उपलब्ध करणार आहे.