ग्लोबल गडचिरोली न्यूज ,
गडचिरोली, ता. १२ : माझे वडील तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम स्वत:ला शेर म्हणवून घेतात. मी त्यांची मुलगी असल्याने मी पण शेरनी आहे. शेरनी जास्त घातक असते हे लक्षात ठेवा. मला शांत राहू द्या. दुर्गा, चंडीकाचे रूप धारण कराया लावू नका, असे धर्मरावबाबांच्या कन्या भाग्यश्री आत्राम म्हणाल्या.
राज्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गुरुवार (ता. १२) प्रवेश केला आहे. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री व शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांची उपस्थिती होती. पुढे भाग्यश्री आत्राम म्हणाल्या की, धर्मरावबाबा यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. तेव्हा शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे नक्षल्यांच्या तावडीतून त्यांची सुटका झाली. खरेतर त्यांच्यावर नुकत्यात निर्माण झालेल्या चित्रपटात मंत्री आत्राम यांनी स्पष्ट कबुलीही दिली आहे. मात्र पवारांचे उपकार विसरून ते पुतण्यासोबत गेले. मला मात्र पवारांच्या पक्षात येऊन त्यांच्या उपकाराची परतफेड करण्याची संधी मिळाली आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांनीनी या भागाच्या अविकसितपणाला दोषी असणार्यांना जनता माफ करणार नाही, असे सांगीतले. भाजप प्रणित महायुतीचे सरकार सर्वच आघाड्यावर सपशेल अपयशी ठरल्याची टीका करत भारतीय जनता पक्षावर टिकेची झोड उडविली. आपल्या अध्यक्षीय भाषणात जयंत पाटील यांनीसुद्धा महायुती सरकार टीका केली. भाजपला धक्का देण्यास तयार रहा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. राष्ट्रवादी पक्षाला गावागावांत पोहोचविण्याची सुचना केली. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पुढे भाग्यश्री आत्राम म्हणाल्या की, अजित पवार मला घर फोडणे बरे नाही सांगत परत येण्याचे आवाहन करत होते. पण मी घर फोडले नसून त्यांनीच काकाची साथ सोडून आपले घर सोडले आहे. म्हणून त्यांनीच इकडे परत यावे. तुम्ही शरद पवार साहेबांना सोडताना विचार केला नाही आणि माझ्यावर टीका करता. आधी आपण घर फोडले हे मान्य करा, असेही त्या म्हणाल्या. भाग्यश्री आत्राम यांनी पक्षप्रवेश करूनही या कार्यक्रमात त्यांची उमेदवार म्हणुन घोषणा झाली नसल्यामुळे कार्यकर्त्यांत थोडी धुसफूस सुरू झाली. जयंत पाटलांनी हे हेरून महाविकास आघाडीने ठरविलेल्या धोरणामुळे आजच्या क्षणाला उमेदवार घोषीत करता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
—————————————