ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २२ : एकेकाळी माओवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील गर्देवाड्यात गडचिरोली पोलिस विभागाच्या पुढाकाराने राज्य परीवहन मंडळाची लाल परी अर्थात बसगाडी पोहोचली असून येथे २२ सप्टेंबरपासून बससेवा सुरू झाली आहे.
१५ जानेवारी २०२४ रोजी गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीपासून या परिसरातील नागरिकांना विविध सोई-सुविधा गडचिरोली पोलिस दलामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून रविवार २२ सप्टेंबरला गर्देवाडा ते अहेरी अशी प्रथमच महाराष्ट्र परिवहन विभागाची एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. नवीन पोलिस मदत केंद्र निर्मितीपूर्वी गर्देवाडा येथून एटापल्ली-अहेरी आदी मोठ्या तालुक्यांच्या ठिकाणी ये- जा करण्याकरिता पक्का रस्ता उपलब्ध नव्हता. तसेच गट्टा (जांबिया) ते वांगेतुरी दरम्यान असलेला ताडगुडा येथील पुलदेखील सुस्थितीत नसल्याने गर्देवाडा परिसरातील १२ गावांतील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु गडचिरोली पोलिस दलाच्या सततच्या पाठपुराव्याने ताडगुडा येथील पुलाचे तसेच रस्त्याचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यात येऊन महाराष्ट्र परिवहन विभाग यांच्या समन्वयाने रविवारी गर्देवाडा ते अहेरी अशी बस सेवा सुरू करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान गावातील महिलांच्या हस्ते बसचे पूजन करून बस सेवा सुरू करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र परिवहन विभागाचे चालक रामू कोलमेडवार व वाहक गणेश गोपतवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच बसचे वाहक गणेश गोपतवार यांनी गावातील नागरिकांना बसच्या प्रवासाचे टप्पे, बस तिकीटाचे दर आदीबाबत सविस्तर माहिती दिली. ही बस सेवा सुरू झाल्यामुळे गर्देवाडा तसेच परिसरातील इतर गावांतील नागरिकांना ये-जा करण्यास व इतर गावांसोबत संपर्क साधण्यास सोईचे होईल. यासोबतच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी, बँकेचे व इतर शासकीय कामे विनाविलंब करण्यासाठी बस सेवेची मदत होईल, अशा शब्दांत गावातील सर्व नागरिकांनी गडचिरोली पोलिस दलाचे व महाराष्ट्र परिवहन विभागाचे आभार मानले. त्यानंतर गावकऱ्यांना बसमध्ये बसवुन पहिल्या फेरीसाठी बसला रवाना करण्यात आले. हा कार्यक्रम पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, हेडरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश रांजनकर यांच्या मार्गदर्शनात पार पडला. या कार्यक्रमास सीआरपीएफचे असिस्टंट कमाण्डेट संतोष डरांगे, पोलिस निरीक्षक जितेंद्र, गर्देवाडा पोलिस मदत केंद्रातील प्रभारी अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक धनाजी शिंदे, पोलिस उपनिरीक्षक संग्राम अहिरे, एसआरपीएफचे पोलिस उपनिरीक्षक देवकुळे व पोलिस अंमलदार यांच्यासह गर्देवाडा येथील शेकडो नागरिक उपस्थित होते.
——————————-