ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ३० : गडचिरोली जिल्ह्यातील रेपनपल्ली येथील पोलिसांनी अवैध दारु व ट्कसह २५ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शनिवार (ता २८) ट्रक वाहन क्र. एम एच १२ एफ. झेड. ८९३१ ने काही व्यक्ती अहेरी ते सिरोंचा रोडने अवैध दारूची वाहतुक करणार आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर जिमलगट्टाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत दसूरकर यांच्या मार्गदर्शनात रेपनपल्लीचे प्रभारी अधिकारी संतोष काजळे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करुन या ठिकाणी रवाना करण्यात आले. या पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार हे आलापल्ली ते सिरोंचा रोडवर कमलापुर टी-पाॅइंट जवळ सापळा रचून बसले असतांना सकाळी ६ वाजता दरम्यान एक संशयीत ट्रक भरधाव वेगाने येतांना दिसला. पोलिसांनी वाहन थांबवून वाहनामध्ये असलेल्या व्यक्तींची नावे विचारली असता, त्यांनी आपले नाव संजय महिपत सावंत ( वय ५१) रा. मुंढे, ता. कराड, जि. सातारा व त्यासोबतच दुसरा व्यक्ती सुनिल प्रकाश पवार ( वय ३२) रा. जैसिंगपुर, ता. शिरोड, जि. कोल्हापूर असे सांगितले. त्यानंतर त्यांना वाहन अडविण्याचे कारण सांगून पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात ९० एम.एल रॉकेट संत्रा डिस्टिलरी देशी दारूचे ५०२ बॉक्स, प्रति बॉक्समध्ये १०० नग प्रमाणे एकूण ५०, २०० नग रॉकेट देशी दारुच्या बॉटल अंदाजे किंमत एकूण १७, ५७००० रुपयांचा दारूचा मुद्देमाल व वाहतुकीकरिता वापरण्यात आलेले जुने टाटा कंपनीचे २५१८ सी मॉडेल ट्रक, वाहन क्र. एम एच १२ एफ. झेड. ८९३१ अंदाजे किंमत ८ लाख रुपये असा एकूण २५ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने उपपोस्टे रेपनपल्ली येथे दोघांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक.नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश व उपविभागीय पोलिस अधिकारी जिमलगट्टा शशिकांत दसूरकर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक संतोष काजळे, पोलिस उपनिरीक्षक सतीश पवार, महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका मेश्राम, नायक पोलिस अंमलदार नैताम, पोलिस अंमलदार यादव, पोलिस अंमलदार गायकवाड, पोलिस अंमलदार तुंकलवार, चालक पोलिस अंमलदार चिंतमवार यांनी पार पाडली.
———————————