ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १ : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे तीन दिवसांपासून सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर असून १ आॅक्टोबर रोजी सिरोंचा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या मुलांच्या वसतिगृहाला आकस्मिक भेट दिली. या वसतिगृहातील अस्वच्छता बघून अतिशय रागावलेले मंत्री आत्राम यांनी हातात फावडे, झाडू घेऊन आधी स्वत: वसतिगृहाची खोली स्वच्छ केली. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मोबाईलवर काॅल करून खडेबोल सुनावर कानउघाडणी केली.
गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार व कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या विद्यार्थी वसतिगृहामध्ये त्यांनी भेट दिली. येथे घाणीचे साम्राज्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं. तेव्हा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी स्वतः फावडे हातात घेत संपूर्ण खोली स्वच्छ केली. त्यानंतर वसतिगृहाची पाहणी करत येथील सुविधांचा अभाव लक्षात येताच अधिकाऱ्यांना फोनवर कडक शब्दात झापले. गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून आदिवासींसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. तुम्हाला सरकार फुकटचा पगार देते का, असा प्रश्न विचारत कामात हयगय केल्यास घरी पाठवण्याची तंबी त्यांनी दिली. ही आदिवासी मुलांच्या वसतिगृहाची इमारत पूर्णपणे गळत असून येथील आलमारीत खर्ऱ्याची पन्नी दिसून आली. मंत्री धर्मरावबाबा आत्राम वसतिगृहाची पाहणी करत असताना कुठलेही कर्मचारी उपस्थित नव्हते. काही वेळानंतर वसतिगृह अधीक्षक त्या ठिकाणी उपस्थित झाला. त्या अधीक्षकाला कचरा दाखवत अशी असते का स्वच्छता, असे म्हणत स्वतः मंत्री आत्राम यांनी स्वच्छता केली. उपस्थित आदिवासी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. विद्यार्थ्यांनी अनेक अडचणी सांगितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून पाच दिवसांच्या आत स्वच्छता व इमारतीची दुरुस्त न झाल्यास तुमचा कार्यालयात येऊन गोंधळ घालणार आणि तुमच्या विभागाच्या मंत्र्यांकडे तक्रार करून निलंबित करण्याचा इशाराही त्यांनी दिला. सध्या त्यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,अहेरी विधानसभेचे अध्यक्ष लक्ष्मण ,सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) चे जिल्हा उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी आरवल्ली,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती कृष्णमूर्ती रिकुला,नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक जगदीश रालबंडीवार, नगरसेवक सतीश राचर्लावार, फाजील पाशा, मदनय्या मादेशी, सत्यन्ना चिलकमारी, संजू पेद्दापल्ली, ओमप्रकाश ताडीकोंडावार, रवी सुलतान, सलार सय्यद, जुगनू शेख, रमेश मानेम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
———————————