गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांना डी. लिट. मिळणार

74
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज í
  1. गडचिरोली,ता.१ : गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षांत सोहळा व १३ वा वर्धापनदिन सोहळा २ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन राहतील. यावेळी विद्यापीठ वर्धापनदिन तथा दीक्षांत सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते डी. लिट. पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.

 

या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विशेष पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते तसेच गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दीक्षांत समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विविध विषयांत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक आणि आचार्य पदवी प्रदान करण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठ वर्धापनदिन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते डी. लिट. पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये चंद्रपूर येथील विदर्भ वनवासी कल्याणचे अध्यक्ष डॉ. शरद सालफळे यांना ‘जीवनसाधना पुरस्कार २०२४’ हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. सोबतच विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयांच्या विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीच्या उद्देशाने गोंडवाना विद्यापीठाची स्थापना २ ऑक्टोबर २०११ रोजी झाली. २ ऑक्टोबर २०२४ रोजी गोंडवाना विद्यापीठ १३ वर्ष पूर्ण करीत आहे. या १३ वर्षाच्या उल्लेखनीय, विस्तारित आणि यशस्वी वाटचालीनंतर या सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यात उत्कृष्ट रासेयो महाविद्यालय एकक पुरस्कार राजुरा येथील श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालय, उत्कृष्ट रासेयो कार्यकम अधिकारी पुरस्कार डॉ. गुरुदास बल्की, डॉ. कुलदीप गोंड, उत्कृष्ट रासेयो स्वंयसेवक पुरस्कार राधिका दोरखंडे, दर्शन मेश्राम, सिद्धी उपाध्ये, २०२२-२३ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट रासेयो एकक महाविद्यालय पुरस्कार गडचांदूर येथील शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय, २०२२-२३ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी पुरस्कार डॉ. शरद बेलोरकर, सत्र २०२२-२३ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट रासेयो स्वंयसेवक पुरस्कार अरबाज शेख यांनाही पुरस्कृत करण्यात येणार आहे. तसेच सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षाती पदव्युत्तर पदवी, पदविका तसेच पीएचडी प्राप्त एकूण १५६ विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदकाने सन्मान होणार आहे.

—————————-