ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ११ : दारूतस्करी करताना पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर आपली गाडी रिव्हर्स घेत पोलिस वाहनाला धडक देऊन पोलिसांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
प्राप्त माहितीनुसार मंगळवार (ता. १) गडचिरोलीतील थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड कर्तव्यावर असताना त्यांना अजय चिचघरे हा दारूविक्रेता त्याचे साथीदार गौरव कोडाप व त्याच्या साथीदारांच्या माध्यमातून महिंद्रा पिक अप वाहन क्रमांक एम.एच.- ३६-टी-२४४९ या वाहनाने चंद्रपूर जिल्ह्यातून दारूची मोठी खेप घेऊन येत आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली. पोलिस पथकाने सापळा रचून चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर नाकाबंदी करून दारूचे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालक गौरव कोडाप याने पोलिसांच्या कायदेशिर आदेशास न मानता वाहन भरधाव वेगाने वाकडी-सेमाना मार्गे पळविले. तेव्हा सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड यांनी त्यांच्या सोबतच्या पोलिस पथकासह शासकीय वाहन क्रमांक एम.एच. ३३ ए.सी. ६४८९ ने पाठलाग सुरू केला. पोलिसांनी वारंवार वाहन चालकास त्याचे वाहन थांबविण्याबाबत आवाज दिला असता वाहन चालक व त्याच्या साथीदाराने त्यांचे वाहन न थांबविता भरधाव वाहनातून पोलिसांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अंदाजे ३० ते ३५ किलोमीटर पाठलाग करत असताना वाहनचालकाने त्याचे ताब्यातील दारूने भरलेले वाहन थांबविले. पोलिस पथकाने वाहनचालकास व वाहनास ताब्यात घेण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाहनातून उतरून दारूच्या वाहनाकडे जात असताना वाहन चालकाने परत शिवीगाळ करून “आज तुम्हे कुचल डालेंगे” असे म्हणून पोलिसांचा जिव घेण्याच्या उद्देशाने दारूने भरलेले वाहन रिव्हर्समध्ये भरधाव वेगाने पोलिस पथकाचे अंगावर आणले. पोलिसांनी आपला बचाव करून रोडच्या कडेस उडी घेतल्याने त्यांना दुखापत झाली नाही परंतु, शासकीय वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ते क्षतिग्रस्त झाले. याचाच फायदा घेऊन आरोपीं हे घटनास्थळावरून दारूने भरलेले त्यांच्या ताब्यातील पिकअप वाहन घेऊन जंगलमार्गे पसार झाले. यासंदर्भात गडचिरोली पोलिस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा या सदराखाली गुन्हा नोंद करून तपासात घेतला. गुन्ह्याचे तपासी अधिकारी भगतसिंग दुलत यांनी त्यांचे गोपनीय बातमीदार सक्रिय करून आरोपींबाबत माहिती घेतली असता हे आरोपी नागपूर येथे पळून गेल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक नागपूर येथे रवाना करण्यात आले. सीताबर्डी पोलिस स्टेशनच्या हद्दीत लपून बसलेले आरोपी गौरव धामदेव कोडाप, रा. बोदली, ता. जि. गडचिरोली व प्रणय सुधीर पंदीलवार, रा. काटली, ता. जि. गडचिरोली यांना ताब्यात घेऊन शुक्रवार (ता. ११)अटक करण्यात आली. या आरोपींना न्यायालयापुढे हजर केले न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंग दुलत, पोलिस हवालदार सतीश कत्तीवार, प्रेमानंद नंदेश्वर, अकबर पोयाम, राकेश सोनटक्के, पोलिस अंमलदार श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, शुक्राचारी गवई व उमेश जगदाळे यांनी पार पाडली.
———