बलात्काच्या गुन्ह्यातील आरोपी १४ वर्षांनंतर अटकेत

137

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ५ : पोलिसांना तब्बल १४ वर्षांपासून गुंगारा देत असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला सोमवार (ता. ४) अटक करण्यात आली आहे. हा आरोपी मुलचेरा तालुक्यातील देशबंधूग्राम येथे राहणारा असून अनादी अमुल्य सरकार (वय ४०) असे त्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार अनादी सरकारला सन २०१२ मध्ये लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये मुलचेरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयाबाहेर आणून बेड्या लावत असताना आरोपी अनादी सरकार पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला परंतु तो सापडला नाही. सन २०१२ पासून पोलिसांच्या तावडीतून फरार झालेला आरोपी अनादी सरकार शोध घेऊनही सापडत नव्हता. आरोपी सरकार हा देशबंधुग्राम येथील आपल्या राहत्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा तसेच अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात मुलचेरा पोलिस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक महेश विधाते यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक संदीप साखरे, पोलिस हवालदार चरणदास कुकडकार, पोलिस हवालदार विष्णू चव्हान, पोलिस शिपाई संतोष दहेलकर, पोलिस शिपाई बाळू केकान, पोलिस शिपाई सचिन मंथनवार, महिला पोलिस शिपाई जयश्री आव्हाड, महिला पोलिस शिपाई शोभा गोदारी यांनी सोमवारी मौजा देशबंधूग्राम येथील आरोपीच्या घरी सापळा रचून त्याला अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीला चामोर्शी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

———————————-