स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी मानवी साखळी व मतदानाची शपथ

47
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • गडचिरोली, ता. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी स्वीपअंतर्गत नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनात रोज विविध उपक्रम राबविले जात आहेत. याअंतर्गत मंगळवार (ता. १२) मतदार जनजागृतीच्या दृष्टीने ४०० विद्यार्थ्यांद्वारे मानवी साखळी उपक्रम स्थानिक कमलताई मुनघाटे हायस्कूलच्या प्रांगणात राबविण्यात आला. तसेच मतदारांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली.
  • स्वीपअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. सचिन मडावी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार, उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, अमरसिंग गेडाम, मुख्याध्यापक स्मिता लडके, भैसारे, गोरडवार, टप्पो आदींची उपस्थिती होती. मानवी साखळी उपक्रमात गडचिरोली येथील संजीवनी हायस्कूल, नवजीवन हायस्कूल, प्रज्ञा कान्व्हेंट, कमलताई मुनघाटे हायस्कूल या शाळांतील प्रत्येकी १०० विद्यार्थी याप्रमाणे एकूण ४०० विद्यार्थ्यांद्वारे मतदान करण्याबाबतचे बोटाचे चिन्ह जमिनीवर साकारलेल्या व तिरंग्याच्या रंगात सुशोभित केलेल्या गोलाकाराभोवती मानवी साखळी तयार करण्यात आली. याप्रसंगी वोट फॉर इंडिया, सर्वांनी मतदान करावे या घोषणा देत उपस्थित मतदारांना मतदान करण्याबाबतची शपथ देण्यात आली. कार्यक्रमासाठी शिक्षण विभाग, समाज कल्याण विभागतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
  • ———————————————