इंटरनेट बँकींग व्यवहाराचा परवाना प्राप्त करणारी राज्यातील पहिली बॅंक ठरली जीडीसीसी

55

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १२ : राज्यातील सहकार व बॅंकिग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके (जीडीसीसी) ला ८ नोव्हेंबर २०२४ ला स्थापन होऊन ४० वर्षे पूर्ण झाली. त्याच दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आनंदाची बातमी प्राप्त झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला इंटरनेट बँकींगच्या माध्यमातून व्यवहार करण्याचा परवाना ८ नोव्हेंबर २०२४ ला प्राप्त झाला. विशेष म्हणजे हा परवाना प्राप्त करणारी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यात पहिली जिल्हा बँक ठरली आहे.

महाराष्ट्रात ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्यरत असून आतापर्यंत कोणत्याही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला इंटरनेट बँकींग व्यवहार करण्याचा परवाना प्राप्त झाला नव्हता. परवाना देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकेची आर्थिक स्थिती, बँकेचे एन.पी.ए. चे प्रमाण आदी निकष पूर्ण करत असलेल्या बँकांना परवाना प्राप्त होतो. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला इंटरनेट बँकींगच्या माध्यमातून व्यवहार करण्याचा परवाना प्राप्त झाल्यामुळे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधून पहिली बँक ठरली, असे बँकेचे अध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यात ५७ शाखांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४ लाख ३५ हजार खातेदारांना जिल्ह्यातील दुर्गम, ग्रामीण व शहरी भागात अत्याधुनिक डिजीटल सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बँकेने यापुर्वीच ग्राहकांना आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी, आय.एम.पी.एस., मोबाईल बँकींग, शेतकऱ्यांना रुपे किसान क्रेडीट कार्ड व ग्राहकांना रुपे डेबीट कार्ड आदी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ३१ मार्च २०२४ च्या आर्थिक स्थितीवर बँकेने ३७०० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा गाठलेला असून बँकेचा नेट एन.पी.ए. शुन्य टक्के आहे. बँकेला इंटरनेट बँकींगच्या माध्यमातून व्यवहार करण्याचा परवाना प्राप्त झाल्यामुळे ग्राहकांना २४ तास बँकींग सेवा उपलब्ध राहणार असुन ग्राहकांना शाखेत न येता इंटरनेट बँकींगच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बँकींग सुविधा उपलब्ध होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकेला इंटरनेट बँकींगचा परवाना प्राप्त झाला. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी वर्ग, खातेदार, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद, महिला बचत गटांचे सदस्य, बँकेचे संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी / कर्मचारी व बँकेचे सर्व हितचिंतक यांच्या विश्वास व सहकार्यामुळेच बँकेला आर. बी. आय. कडून परवाना प्राप्त झाल्याचे बँकेचे अध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार यांनी म्हटले असून त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

  • ———————————-