गडचिरोली जिल्ह्यात मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६९.६३टक्के मतदान मतदानाची अंतिम टक्केवारी रात्री उशीरापर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता

205
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,दि.२० (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील ६७-आरमोरी, ६८-गडचिरोली व ६९-अहेरी या तीनही मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. दुर्गम, नक्षलग्रस्त भागातील अतिसंवेदनशील मतदानकेंद्रांवरही मतदानासाठी नागरिकांची मोठ्या रांगा लागल्या होत्या. कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरारी ६९.६३टक्के मतदान झाले होते. यात ६७-आरमोरी – ७१.२६ टक्के , ६८-गडचिरोली- ६९.२२ टक्के व ६९-अहेरी- ६८.४३ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. मतदानाची अंतिम टक्केवारी दुर्गम भागातील पथकांकडील आकडेवारी मिळाल्यावर स्पष्ट होणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे.

आज सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी लागलेल्या मतदारांच्या मोठमोठ्या रांगेतून दिसून येत होते. शहरी व ग्रामीण भागत मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वृद्ध व दिव्यांग मतदारांकरीत व्हीलचेअरची व्यवस्था तसेच सर्वांकरिता पाणी व आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मतदान केंद्रांवर करण्यात आल्या होत्या. मदतीसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे कर्मचारी नेमण्यात आले होते. अनेक ठीकाणी मतदानाची वेळ संपल्यावरीही नागरिक मतदानासाठी रांगेत उपस्थित होते. अशा ठिकाणी रांगेतील शेवटच्या मतदारापासून सर्वांना टोकन वाटप करून त्यांचे मतदान पूर्ण करण्यात आले.