गडचिरोली,ता. २९ : जिल्हा मुख्यालयाच्या गडचिरोली- चंद्रपूर महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या नाल्यात शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता एका अभियंत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. विजेश उर्फ धनपाल भलावी (वय ४३) रा. देवरी, जि. गोंदिया, अशी मृताची ओळख पटली.
मृत भलावी हे जिल्ह्यातील सिरोंचा पंचायत समिती कार्यालयात पाणीपुरवठा विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. सध्या ते शहरातील पंचवटी नगर येथे राहत असल्याची माहिती आहे. मृत विजेश भलावी हे बुधवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी दुपारी १ वाजता विजेश भलावी यांचा मृतदेह राष्ट्रीय महामार्गालगतच्या गटारात दिसला. याची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. माहिती मिळताच शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत विजेश यांना दारूचे व्यसन होते. त्याचबरोबर शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यांच्या अंगात जॅकेट असल्याने ही घटना रात्री घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
————————-