ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ६ : जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील कुरुंडी टोला व खैरी टोला या गावांमधील दारूविक्रेत्यांकडून एकूण २५ लिटर हातभट्टी मोहफुलाची दारू जप्त करत दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई कुरखेडा पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.
कुरुंडी टोला व खैरी टोला येथील अवैध दारूविक्री बंदीसाठी मुक्तिपथतर्फे विविध कृती कार्यक्रम राबविले जात आहेत. या गावातून अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनेच्या महिलादेखील प्रयत्न करत आहेत. परंतु काही विक्रेते चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्रीचा व्यवसाय करत असतात. अशातच कुरुंडी टोला येथील वासुदेव रूपची नैताम (वय ४५) हा चोरट्या मार्गाने दारूविक्री करत असल्याची माहिती प्राप्त होताच मुक्तिपथ व कुरखेडा पोलिसांनी धाड टाकून तपासणी केली. संबंधित विक्रेत्याच्या घरी १० लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. दुसरी कारवाई खैरी टोला येथे करण्यात आली. या गावातील प्रशांत सोनू नैताम (वय २८) या विक्रेत्याकडून १५ लिटर दारू जप्त करण्यात आली. दोन्ही कारवायांमध्ये एकूण २५ लिटर मोहफुलाची दारू जप्त करत दोन्ही विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक वाघ यांच्या नेतृत्वात सहायक फोजदार कुसन हलामी यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका टीम उपस्थित होती.
————————————